शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या ईडी अटकेवरून भाजपावर हल्लाबोल केलाय. “आरोप करणाऱ्यांना पळून जाण्यास केंद्राचं पाठबळ मिळतं आणि ज्याच्यावर आरोप झालेत तो चौकशीला हजर राहिल्यावर अटक होते आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसेच हे सर्व पाहून भाजपाचे नेते टणाटणा उड्या मारतायेत. दिवाळीनंतर आम्ही असं करू, तसं करू म्हणत आहेत. पण तेव्हा यांना बाथरूममध्ये स्वतःची तोंडं लपवून बसावं लागेल, असा इशाराही दिला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पळून गेलेले नाहीत, तर त्यांना पळून लावलं आहे. कुणीही देशाबाहेर पळून जातो तो केंद्रातील सरकारच्या मदतीनेच पळून जाऊ शकतो. मुंबईचा पोलीस आयुक्त राहिलेला एक अधिकारी, महासंचालक दर्जाचा अधिकारी जेव्हा देश सोडून जातो तेव्हा त्याला केंद्राचं संपूर्ण पाठबळ असतं. त्याशिवाय तो जाऊच शकत नाही. त्यांनी आरोप केला आणि पळून गेला. त्याच आरोपांच्या आधारावर केंद्रीय तपास संस्था तपास करतात आणि महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना अटक करतात. चौकशी, तपास होऊ शकतो, पण ईडीला भेटल्यानंतर लगेच अटक करण्यात आली. हे सर्व ठरवून चाललं आहे.”

“भाजपाचे लोक जंगलात राहतात का?”

“महाविकासआघाडीच्या प्रमुख लोकांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे. आज अजित पवार यांच्याशी संबंधित लोकांवर कारवाया झाल्या. भाजपाचे लोक जंगलात राहतात का? त्यांच्या संपत्ती सर्व वैध आहे का? आम्ही याविषयी माहिती दिलीय, त्यांना हात लावलेला नाही. त्यांची बायका-मुलं कुटुंब आणि आमची काय रस्त्यावर आहेत का?” असा सवाल राऊत यांनी विचारला.

“एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल”

“हे अत्यंत घाणेरडं राजकारण ज्यांनी सुरू केलंय हे त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील राजकारणात कायमच चांगलं वातावरण होतं. हे बिघडवण्यात आलंय आणि त्याची जबाबदारी भाजपाची आहे. हे सर्व पाहून आज ते टणाटणा उड्या मारतायेत, पण एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल,” असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिलाय.

“तेव्हा हे स्वतःची तोंडं बाथरूममध्ये लपवून बसतील”

संजय राऊत म्हणाले, “काही लोकं म्हणतात दिवाळीनंतर आम्ही असं करू, तसं करू. यांना घरातून नाही, हे स्वतःची तोंडं बाथरूममध्ये लपवून बसतील असे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतात. पण हे करायचं का, आम्ही तुमच्या कुटुंबापर्यंत पोहचायचं का?”

हेही वाचा : संजय राऊत म्हणतात, “मोदींऐवजी इतर कोणी पोप फान्सिस यांच्या भेटीसाठी गेलं असतं तर…”

“बाळासाहेब ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो की शरद पवार असो आम्हाला आमच्या नेत्यांनी राजकारणात हे शिकवलं नाही. ही पातळी ओलांडायची नाही, संयम महत्त्वाचा, संस्कार आणि संस्कृती पाळायची. केंद्रीय संस्था आज जे करत आहेत ते राजकीय षडयंत्र आहे. प्रत्येकाच्या बाबतीत घडतंय. मी सुद्धा भोगलंय,” असंही त्यांनी नमूद केलं.