scorecardresearch

अनिल देशमुख-नवाब मलिकांच्या मतदानावरून संजय राऊत आक्रमक; म्हणाले, “खून करून शिक्षा भोगणाऱ्या…”

अनिल देशमुख व नवाब मलिक यांना विधान परिषदेत मतदान करण्याचा हक्क नाकारल्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Sanjay Raut Nawab Malik Anil Deshmukh
संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख (संपादित छायाचित्र)

न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख व नवाब मलिक यांना विधान परिषदेत मतदान करण्याचा हक्क नाकारला. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खून करणाऱ्या आणि त्यासाठी शिक्षा सुनावलेल्या कैद्याला देखील घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे. मग या दोन आमदारांना कोणत्या न्यायाने मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. ते रविवारी (१९ जून) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आलाय. तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे. ३०२ कलमाखाली खून करणाऱ्या आणि त्यासाठी शिक्षा सुनावलेल्या कैद्याला देखील मतदानाचा अधिकार असतो.”

“कोणत्या न्यायाने आमदारांचा मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला?”

“घटनेने त्यांना अधिकार दिलेला आहे. तुम्ही घटनेची कलमं पाहा. मात्र, ज्यांना लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांची आमदारकी शाबूत असणाऱ्या दोन सदस्यांना कोणत्या न्यायाने हा अधिकार नाकारण्यात आला? कोणत्या कलमाने तुरुंगातील आमदारांचा मतदानाचा अधिकार नाकारला याविषयी संभ्रम आहे,” असं मत संजय रऊत यांनी व्यक्त केलं.

“राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत पडद्यामागून खेळ”

संजय राऊत पुढे म्हणाले, “हे सर्व दबावाखाली होत आहे. महाविकासआघाडीची दोन मतं कमी करण्यासाठी राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत पडद्यामागून खेळ सुरू आहे. त्यामुळे देशाची लोकशाही, स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे.

सर्व आमदारांना हॉटेलमध्ये का जमा केलं जातंय? संजय राऊत म्हणाले…

हॉटेल पॉलिटिक्सविषयी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, “राज्यसभा असो की विधान परिषद, निवडणुकीची प्रक्रिया पाहता आमदारांना प्रशिक्षणाची गरज असते. पहिलं प्राधान्य, दुसरं प्राधान्य हे ठरवण्यासाठी सर्व आमदार एकत्र आले तर त्यांना मार्गदर्शन केलं जातं. आधी हे होत नव्हतं, आता होत आहे. कारण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष भाजपाकडे केवळ दोन मतं अधिक आहेत आणि जिंकण्यासाठी त्यांना २० मतं हवी आहेत. ते कोठून आणणार आहेत?”

हेही वाचा : शिवसेना आमदारांचा काँग्रेसला मतदान करण्याला विरोध आहे का? संजय राऊत म्हणाले…

“आता काही लोकांनी निर्लज्जपणा सुरू केला आहे”

“ही मतं चोऱ्यामाऱ्या करून, दहशत निर्माण करून, दबाव टाकून आणले जातील. त्यामुळेच आम्ही आमच्या आमदारांना एकत्र ठेवत आहोत. हे सर्व प्रकार लोकशाहीत खुलेआम सुरू झाले आहेत. पूर्वी हे प्रकार छुपेपणाने सुरू असायचे. आता काही लोकांनी निर्लज्जपणा सुरू केला आहे. त्यालाच ते लोकशाही मानतात. ही लोकशाही नसून एकप्रकारची हुकुमशाही आहे, पण ही फार काळ चालणार नाही,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-06-2022 at 12:06 IST
ताज्या बातम्या