मोदी सरकारने अचानक संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यानंतर देशात 'वन नेशन, वन इलेक्शन' (एक देश, एक निवडणूक) यावर एका समितीचंही गठण करण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळात लोकसभेसह सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच मोदी सरकार 'इंडिया' आघाडीच्या ताकदीला घाबरल्याने त्यांनी एक देश, एक निवडणुकीचा प्रकार आणला आहे, असा आरोप केला. ते शुक्रवारी (१ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. संजय राऊत म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काल 'वन नेशन, वन इलेक्शन'चा (एक देश, एक निवडणूक) एक नवा फुगा हवेत सोडला आहे. त्याआधी एक निशाण, एक संविधान असंही म्हटलं गेलं. जम्मू-काश्मीरमध्ये काय घडलं? मोदी सरकारने आधी वन नेशन, वन इलेक्शन अंतर्गत तिथं निवडणूक घ्यावी. मणिपूरमध्येही निवडणूक घ्यावी." "दबावाखाली काम करणारा भ्रष्ट आयोग जोपर्यंत…" "देशात वन नेशन, वन इलेक्शनऐवजी फेअर इलेक्शन (निष्पक्ष निवडणूक) घ्यायला हवी. भ्रष्ट निवडणूक आयोग या देशात काम करत आहे. तो भ्रष्ट निवडणूक आयोग दूर केला पाहिजे. दबावाखाली काम करणारा भ्रष्ट आयोग जोपर्यंत आहे तोपर्यंत देशात निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाही. त्यामुळे एक देश, एक निवडणूक हा राजकीय फंडा आहे," असा आरोप संजय राऊत यांनी केला. हेही वाचा : संजय राऊतांचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, म्हणाले, “मुंबईच्या संपत्तीवर…” "मोदी सरकार इंडिया आघाडीच्या ताकदीला घाबरलं" "मोदी सरकार इंडिया आघाडीच्या ताकदीला घाबरलं आहे. त्यामुळे माथेफिरुपणातून एक देश, एक निवडणूक हा प्रकार सुचला आहे," अशी टीकाही राऊतांनी केली.