scorecardresearch

“हनुमान चालिसाविषयी कोण बोलतंय बघा”; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ‘हनुमान भगवान नही है, हनुमान एक जंगली वानर है’ असे वक्तव्य करणारे आम्हाला हनुमान चालीसाविषयी सांगतात असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला. यावेळी त्यांनी अयोध्येला जाणाऱ्यांनी आपल्या नेत्यांचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयीचे वक्तव्य काय आहे हे पण समजून घ्या, असं म्हणत राज ठाकरेंवर निशाणा साधला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांची चिंता करण्याची गरज नाही. काही लोक या देशामध्ये दंगे घडवून विभाजन करण्याचा डाव करत आहेत. त्यांच्या विरोधात देखील शिवसेना लढत आहे. सन्मानीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान विरुद्ध केलेले उद्गार काय आहेत, हनुमान एक दलित व्यक्ती आहे. ‘हनुमान भगवान नही है, हनुमान एक जंगली वानर है’ असे वक्तव्य करणारे आम्हाला हनुमान चालीसाविषयी सांगतात.”

“अयोध्येला जाणाऱ्यांनी आपल्या नेत्यांचे योगींबद्दलचे वक्तव्यही समजून घ्या”

“ज्या अयोध्येमध्ये चालले आहेत त्या राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी आपल्या नेत्याचे वक्तव्य काय आहेत हे पण जरा समजून घ्या. ‘कोण हैं आदित्यनाथ, वो गंजा आदमी भगवे कपडे पहन के घुमता हैं पागल जैसा’ असं म्हणणारे अयोध्येला जात आहेत. आम्हाला बोलायला लावू नका. आता योगी त्यांचे कसे स्वागत करणार आम्ही पाहणार आहोत. योगी यांना गंजा, टकलू आदमी, भगवे कपडे खालून इकडे तिकडे फिरणारा असं बोलणाऱ्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवण्याची गरज नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“अश्विनी कुमार चौबे यांनी पुन्हा एकदा योगी चालीसा वाचायला पाहिजे. मला हनुमान माहित आहे. महाराष्ट्र हा राम आणि हनुमानाचा पूजक आहे,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

“खेळी नसून जशास तसे उत्तर देणे शिवसेनेचा धर्म आणि…”

संजय राऊत म्हणाले, “खेळी नसून जशास तसे उत्तर देणे शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव आहे. जशास तसे उत्तर आम्ही नेहमीच देत असतो, हे आमचे बाळकडू आहे. शुक्रवारच्या (३० एप्रिल) बैठकीत ज्या सूचना दिल्या आहे त्याचं नक्कीच पालन होणार आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावाने नाव खराब करण्याचे काम काही जण करत आहेत. खास करून महाराष्ट्राची  बदनामी काही असामाजिक संघटना करत आहेत. त्यांना उत्तर देत सामोरे जाऊ. शिवसेना छातीवर वार झेलणारा आणि समोरून वार करणारा पक्ष आहे. पाठीमागून वार आमच्यात चालत नाही.”

“आतापर्यंत आमचं सरकार असल्यानं संयम बाळगला, पण…”

“आतापर्यंत आम्ही आमच्याकडे सत्ता असल्यानं आणि आमचं सरकार असल्यानं संयम बाळगला, पण पाणी डोक्यावरून जात आहे. त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावे लागेल, मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील. आम्हाला लढण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज नाही. आम्हाला लढण्यासाठी भाडोत्री लोक देखील लागत नाही. आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लढत नाही. आमची हत्यारे आमचीच आहे आणि ती धारदार आहेत. दोन घाव बसले की पाणी मागणार नाही,” असं म्हणत राऊतांनी इशारा दिला.

“महाराष्टामध्येच नाही, देशातही राजद्रोहाचे गुन्हे दाखल होतात”

संजय राऊत पुढे म्हणाले, “राजद्रोहा संदर्भात काही नियम अटी शर्ती असतात. जर कोणी राजद्रोहा सारखा गुन्हा केला असेल तर देशात अशाप्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत, महाराष्टामध्येच नाही. पंतप्रधानांबाबत ट्वीट केले, तर गुन्हा दाखल होतो, कोणी स्टँड अप कोमेडियनने सहज विनोद केला तर त्यावर देखील राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो.”

हेही वाचा : ‘योगी आणि भोगी’ वक्तव्यावरुन संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, “एखाद्याला पीएचडी करायची असेल तर…”

“बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुम्ही जी बेमानी केली त्याबाबत कदाचित बाळासाहेब ठाकरे यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील,” असं म्हणत त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा साधला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut criticize yogi adityanath and mns chief raj thackeray on hanuman chalisa pbs