scorecardresearch

“भाजपाने फेकलेले तुकडे तोंडात घेऊन…”; बावनकुळेंच्या विधानावरून संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्र!

आगामी विधानसभा निवडणुदरम्यान भाजपा २४० जागा लढवेन आणि शिंदे गटाच्या वाट्याला ४८ जागा येतील अशा आशयाचं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एका सभेत बोलताना केले होते.

sanjay raut
संजय राऊत संग्रहित छायाचित्र

आगामी विधानसभा निवडणुदरम्यान भाजपा २४० जागा लढवेन आणि शिंदे गटाच्या वाट्याला ४८ जागा येतील अशा आशयाचं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एका सभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनीही यावरून शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी केलं भाष्य; महाविकास आघाडीला लक्ष्य करत म्हणाले…

काय म्हणाले संजय राऊत?

“हीच शिंदे गटाची लायकी आहे. ज्या शिवसेनेने २०१४ मध्ये एका जागेसाठी युती तोडली होती, ती स्वाभिमानासाठी तोडली होती. आता यांच्यासमोर ४०-४५ जागांचे तुकडे फेकले जात आहेत. यांच्यासमोर आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि हेच तुकडे तोंडात ठेऊनच त्यांना जगावं लागेल, यांच्यात कोणताही स्वाभिमान नाही. राज्याचा भाजपाचा प्रदेशाध्यक्ष सांगतो, तुम्हाला ४० जागा देऊ, २५ जागा देऊ उद्या ते यांना पाच जागा सुद्धा देतील. हीच त्यांची लायकी आहे. त्यामुळेच भाजपाने शिवसेना तोडली. त्यांना या महाराष्ट्रात शिवसेनेचा दरारा संपवायचा होता.”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा – भाजप-शिवसेनेचे जागावाटप झालेले नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

शेतकरी आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य

यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केलं. “मुळात मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र तरी माहिती आहे का? त्यांना शेतकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे प्रश्नतरी माहिती आहेत का? तर दुर्देवाने याचं उत्तर नाही असे आहे. मुख्यमंत्र्यांना केवळ सुप्रीम कोर्टाच्या निकालाची काळजी आहे. निवडणूक आयोगाप्रमाणे हा निकाल सुद्धा विकत घेता येईल का? यावर त्यांचा विचार सुरू आहे. पण आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राला न्याय मिळेल”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अनिक्षा जयसिंघानीला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

“सरकारच्या निष्काळजीपणामुळेच शेतकऱ्याचा मृत्यू”

“सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या की नाही, हा वादाच विषय आहे. कारण शेतकऱ्यांच्या मोर्चा आजही सुरू आहे. दुर्देवाने एका शेतकऱ्याचा काल मृत्यू झाला. याला सरकारचा बेकिरीपणा, निष्काळजीपणा कारणीभूत आहे. सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत. दोन फुसके मंत्री चर्चा करण्यासाठी नेमके होते. एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्याचं प्रायश्चित तुम्ही केलं पाहिजे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा – २०२४ च्या निवडणुकीनंतर मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील; अमित शाहांचा विश्वास

“सरकारवर निसर्ग कोपला आहे”

“या सरकारवर निसर्ग कोपला आहे. राज्यातील अनेक भागात पावसामुळे शेतपिकांचं नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, हे सरकारने कोर्टबाजीत गुंतलं आहे. विरोधकांना त्रास देण्यात हे सरकार व्यस्त आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळला जातो आहे, याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 10:52 IST
ताज्या बातम्या