मुंबई: राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी देण्याच्या निर्णयावरून रिक्षाचालकांमध्ये असंतोष आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एक पत्र लिहून बोचरी टीका केली. सरनाईक यांचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सरनाईक हे स्वतः रिक्षाचालक म्हणून काम करून राजकारणात पुढे आले आहेत. रिक्षाचालकांच्या रोजगाराचा प्रश्न त्यांना चांगला माहिती असताना त्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष कसे करू शकते, बाईक टॅक्सी कंपनीचे काही मंत्र्यासोबत साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी या पत्रात केला आहे.
राऊत यांनी सरनाईक यांना लिहिलेल्या पत्रातून राज्यातील रिक्षाचालकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. ओला, उबेर आणि रॅपिडो या ॲप माध्यमातून बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय झाल्यास त्याचा थेट परिणाम रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर होईल. राज्यातील हजारो रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह रिक्षा व्यवसायावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत बाईक टॅक्सीला प्रोत्साहन देणे म्हणजे पारंपरिक रिक्षा व्यवसायावर संकट येणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवली होती. सरनाईक यांच्याही कारकीर्दीची सुरुवात रिक्षा चालवून झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचे कष्ट आणि त्यांच्या रोजीरोटीचे महत्त्व त्यांना माहिती आहे. असे असताना बाईक टॅक्सीच्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या रोजगारावर परिणाम होणार असताना सरकारने हा निर्णय घेण्याचा आग्रह का धरला, असा सवाल राऊत यांनी केला आहे. ‘ज्यांनी रिक्षा चालवून संघर्ष केला, त्यांनीच आज रिक्षाचालकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे दुर्दैवी आहे,’ असा टोला लगावला.
रॅपिडो बाईक टॅक्सी सुरू करण्यामागे काही मंत्र्यांचे हितसंबंध असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे. काही मंत्र्यांच्या कार्यक्रमांना रॅपिडो कंपनीकडून देणगी अथवा प्रायोजकत्व मिळत असल्यानेच ही सेवा सुरू करण्यासाठी संबंधित मंत्री आग्रही असल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपांमुळे बाईक टॅक्सीच्या निर्णयावरून नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांनी मुंबईत आयोजित केलेल्या प्रो गोविंदा लीगसाठी गेल्या वर्षी रॅपिडोने प्रायोजकत्व दिले होते. कार्यक्रमाला २० कंपन्यांनी प्रायोजकत्व दिले होते. त्यापैकी रॅपिडो एक असल्याचे सरनाईक यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. रॅपिडो कंपनीच्या प्रायोजकत्वाचा आणि बाईक टॅक्सीला मिळणाऱ्या सरकारी पाठिंब्याचा काही संबंध आहे का, असा अप्रत्यक्ष सवाल राऊत उपस्थित केला आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रिक्षाचालकांच्या संघटनांना परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडायच्या आहेत. त्यांना भेट मिळत नसल्याची तक्रारही राऊत यांनी पत्रातून केली आहे. १० ऑगस्ट रोजी नाशिक येथे रिक्षाचालकांचा मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याला परवानगी नाकारण्यात आली. रिक्षाचालकांच्या रोजगाराचा प्रश्न गांभीर्याने घेऊन बाईक टॅक्सीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि रिक्षाचालकांच्या संघटनांशी तातडीने चर्चा करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
