मुंबई: संयुक्त महाराष्ट्रासाठी गिरणी कामगारांसह तात्कालीन नेत्यांनी लढलेली लढाई ही भांडवलदारांच्या विरोधात होती. मुंबई भांडवलदारांच्या घशात घालण्याचे राज्यकर्ते, उद्योजक व धनिकांचे षडयंत्र होते. सध्या सुरु असलेली आमची लढाई भांडवलदारांच्या विरोधात आहे. त्यामुळे ती आणि ही लढाई ही भांडवलदारांच्या विरोधात आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी रक्त सांडणाऱ्या हुतात्मा स्मारकाची अतिशय दारुण अवस्था आहे. मोठमोठे प्रकल्प उभारणाऱ्या सरकारने कधीतरी स्मारकाची पाहणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुंबईतील हुतात्मा चौकातील स्मारकाला तडे गेले आहेत. हे स्मारक मुंबई पालिकेच्या अखत्यारीत येत असले तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या स्मारकाची पाहणी करण्याची आवश्यकता आहे. केवळ महाराष्ट्र दिनी संचलन, ध्वजवंदन, आणि सलामी घेऊन हा दिवस साजरा करु नका. महाराष्ट्र दिन वगळता या स्मारकाला भेट दया असा सल्ला राऊत यांनी दिला. मुंबईवर मराठी माणसाचे वर्चस्व राहिले पाहिजे. महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम होऊ नये यासाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढली गेली होती. या लढाईत असंख्य लोकांनी भाग घेतला होता. प्रबोधनकार ठाकरे, अमृत डांगे, काॅम्रेड डांगे, आचार्य अत्रे, भालचंद्र कोठारी, आण्णाभाऊ साठे, यांनी महाराष्ट्र पेटवला. त्यावेळी कुठे हा मुंबईसह महाराष्ट्र मिळाला आहे. मुंबई भांडवलदारांच्या घशात घालण्याचे षडयंत्र आजही तसेच सुरु आहे. आमची लढाई या भांडवदारांच्या विरोधात सुरु असल्याचे राऊत यांनी सांगितले.
