मुंबई: राज्यभरातील राजकीय व सामाजिक घडामोडींमुळे मुंबई पोलिसांवर प्रंचड ताण येत आहे. कागदोपत्री ८ तास काम दाखवले जात असताना प्रत्यक्षात मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्याकडून १२ तासांहून अधिक काळ काम करवून घेतले जाते. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात स्वत: लक्ष घालून मुंबई पोलिसांच्या ८ तास कामाच्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पोलिसांसाठी कामाचे ८ तास करण्याच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या निर्णयाची आठवण राऊत यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४ मे २०२२ रोजी बृहन्मुंबई पोलीस दलातील अंमलदारांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक स्थायी आदेश जारी केला होता. अपवादात्मक परिस्थिती वगळता पोलिसांना ‘८ तास ड्यूटी आणि १६ तास आराम’ देण्याचे स्पष्ट निर्देश या आदेशात देण्यात आले असल्याचे म्हटले आहे.
आज दुर्दैवाने या शासन निर्णयाची अंमलबजावणी केवळ कागदावरच उरली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाणारा ड्युटीचा रोस्टर (तक्ता) पाहिला, तर पोलीस शिपाई ८-८-८ तासांच्या तीन शिफ्टमध्ये काम करत असल्याचे भासवले जाते. मात्र, वास्तवात मैदानावर काम करणाऱ्या सामान्य पोलीस अंमलदाराकडून दररोज १२ तास किंवा त्याहून अधिक काळ काम करवून घेतली जात असल्याची बाब त्यांनी आपल्या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांसमाेर मांडली आहे.
सततचे बंदोबस्त, व्हीआयपी ड्युटी, विविध राजकीय पक्षांची आंदोलने आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांना आठवड्याची हक्काची सुट्टीही नीट मिळणे कठीण झाले असून त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत आहे. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीकाेनातून कागदावरील ‘८ तास ड्युटी’चा नियम प्रत्यक्ष पोलीस ठाण्यांमध्ये आणि बंदोबस्ताच्या ठिकाणी काटेकोरपणे लागू करावा.मुंबईच्या सुरक्षेचा भार आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या पोलीस बांधवांची ही मूक वेदना लक्षात घेऊन राज्य सरकारने मनुष्यबळ वाढवण्यासह ड्युटीच्या वेळांचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
