राज ठाकरे यांनी काल मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, ही भेट संपूर्णत: कौटुंबिक असल्याचे शनिवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. जयदेव ठाकरे यांनी न्यायालयात केलेल्या काही विधानांमुळे कौटुंबीक मतभेद मिटविण्यासाठी ठाकरे बंधूंनी भेट घेतल्याचीही शक्यताही काहीजणांकडून वर्तविण्यात येत होती. मात्र, संपत्तीच्या वादाचे प्रकरण हाताळण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही भेट मुंबई व ठाण्यासह दहा जिल्ह्यांत होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकांसाठी झाल्याची शक्यता अधिक प्रबळ झाली आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच ‘मन की बात’ करतील, असेही संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष उद्धव यांच्याकडे लागले आहे.
विविध सभांमधून आणि पत्रकार परिषदांमधून शिवसेनेविरोधात भूमिका मांडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे दुपारचे भोजन केले. तसेच विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती मिळते आहे. सुमारे सव्वातास राज ठाकरे ‘मातोश्री’वर होते. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे सुद्धा राज ठाकरे यांच्यासोबत उपस्थित होते. एकीकडे शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमधील वाद दिवसेंदिवस वाढत असताना येत्या काही महिन्यात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते.