शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधीमंडळातील लांबलेल्या मतमोजणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी कोणी व का थांबवली? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच आधी ईडीचा डाव फसला, त्यामुळे भाजपाने आता रडीचा डाव सुरू केल्याचा आरोपही केला. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला. आम्हीच जिंकू, जय महाराष्ट्र!”

“भाजपाला महाराष्ट्रात आणि देशात दंगली घडवायच्या आहेत”

दरम्यान, भाजपाचे निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्याविरोधात महाराष्ट्रासह देशभरात मुस्लीम समाज ठिकठिकाणी रस्त्यावर उतरला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला महाराष्ट्रात आणि देशात दंगली घडवायच्या आहेत, असा गंभीर आरोप केला. ते शुक्रवारी (१० जून) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “या देशाचा इतका अपमान यापूर्वी कधीही झाला नव्हता. जगभरात आपला निषेध सुरू आहे, जगभरात आपली छी-थू होतेय. जगभरात अनेक देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बंदी आणण्यात आली आहे. या देशात असं कधी झालं नव्हतं. भाजपाला महाराष्ट्रात आणि देशात दंगली घडवायच्या आहेत.”

“महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणार”

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही. विरोधी पक्षाकडून चूकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

“आमचे चारही उमेदवार विजयी होतील”

“आजच्या मतदानानंतर सगळ्यांनाच हे आकडे स्पष्ट दिसतील, असेही राऊत म्हणाले. तसेच राज्यसभा निवडणुकीच्या अगोदर काँटे की टक्कर, चूरससारखे वातावरण निर्माण करण्यात आले होते हे चूकीचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमचे चारही उमेदवार विजयी होतील. त्यात एक दोन शिवसेनेचे, एक काँग्रेसचा आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल,” असे राऊत म्हणाले.

हेही वाचा : “याआधी अशी हिंमत कुणी केली नव्हती, पण भाजपाने…”, संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया!

“महाविकास आघाडीत नाराजी नाही”

राज्यसभा निव़डणूक मतदानासाठी काही तास शिल्लक असतानाच महाविकास अघाडीच्या रणनितीत मोठा बदल करण्यात आला. शरद पवारांनी ऐनवेळी मताचा कोटा ४२ वरून वाढवून ४४ केला आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut question delay in rajya sabha election vote counting pbs
First published on: 10-06-2022 at 19:59 IST