शिवसेना खासदार संजय राऊत यांची शुक्रवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सुमारे १० तास चौकशी केली. यावेळी त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला. गोरेगाव येथील पत्राचाळीच्या १ हजार ३९ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. १० तासांनंतर कार्यालयाबाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधताना सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणूक प्रचारामध्ये वापरलेले ‘मी पुन्हा येईन’ हे शब्द वापरल्याचं दिसून आलं.

नक्की वाचा >> विश्लेषण : राऊतांच्या संपत्तीवर जप्ती आणणारं १०३९ कोटींचं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय? कोणी आणि कसा वळवला पैसा?

ईडीने राऊत यांना समन्स बजावून १ जुलैला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास ते ईडीच्या बेलार्ड पियर येथील कार्यालयात हजर झाले. या वेळी पत्रकारांशी बोलताना आपला पत्राचाळ गैरव्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तपासाला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी राऊत यांनी समाज माध्यमांवर ईडी कार्यालयाबाहेर कोणीही जमा होऊ नये, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. राऊत यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त ठेवला होता. रात्री १० च्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी चौकशीला सहकार्य केले आहे. जी उत्तर हवी होती, ती दिली आहेत. अजून हवी असतील किंवा पुन्हा बोलावले, गरज लागली तर मी पुन्हा येईन असंही त्यांना सांगितलं, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, राऊत यांना पुन्हा चौकशीला बोलवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.