एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यानंतर राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. आज पत्रकार परिषद घेत मलिकांनी फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, “हे आरोप-प्रत्यारोपाच राजकारण थांबले पाहिजे. या आरोपांच्या चिखलफेकीत मोठ्यांनी लक्ष देण गरेजच आहे. नवाब मलिकांचे आरोप संतापातून होत आहेत. काल मी राज्यपालांना भेटलो त्यांनी देखील यावर चिंता व्यक्त केली”, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

राज्यात रोज चिखलफेक होत आहे. ज्यांनी ही चिखलफेकेची परंपरा सुरु केली त्यांचा पळताभुई होतोय. ते लपून बसले आहेत, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचे नाव न घेता केली. राज्यात सध्या प्रमुख माणूस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे राऊत म्हणाले.

भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये गेला की एकदम चकचकीत होतात

संजय राऊत म्हणाले, “कुणी कोणता फोटो दाखवला तर तो सबंध असल्याचा पुराव होऊ शकत नाही. रियाज भाटीचे फोटो नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील आहेत. भाजपाकडे जी वॉशिंग मशीन आहे. त्यामध्ये घातले की सगळे स्वच्छ होतात. ती मशीन भाजपाने तयार केली आहे. गुंड, दाऊद, शकीलचे लोक आमच्याकडे असले तर याचा माणूस त्याचा माणूस मात्र भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये गेला की एकदम चकचकीत शुभ्र होतो. सध्याच्या राजकारणात कोणीही कोणाकडे बोट दाखवू नये. महाराष्ट्रात रोज चिखलफेक सुरू आहे यांना कंटाळा कसा येत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इतर प्रश्नाकडे पाहायला हव”

भाजपाने नौटंकी बंद करावी

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर संजय राऊत म्हणाले, “शिवसेना कामगार वर्गातून जन्माला आली आहे, कष्टकरी मजूरवर्ग हा शिवसेनेचा पाठीराखा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कष्टकऱ्यांच नेतृत्व शिवसेना करत आहे. त्यामुळे आमची भूमिका चुकीची आहे हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. आज ज्या मागण्या एसटी कर्मचारी करत आहेत त्याच मागण्या घेऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एसटी कामगार संघटनेचे लोक गेले होते, तेव्हा त्यांना हकलण्यात आलं, हे मी एका व्हिडिओत बघितल आहे.”

“कामगारांना फुस देणे, आंदोलन करणे ही नौटंकी भाजपाने बंद करावी. याला एसटी कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये आणि नुकसान करुन घेऊ नये”, असे आवाहन राऊत यांनी कर्मचाऱ्यांना केले. 

आज गोपीनाथराव मुंडे असते तर…

“भाजपा पक्ष सध्या बाहेरच्या लोकांनी हायजॅक केलेला आहे. ज्यांचा पक्षाच्या विचारांशी काही सबंध नाही, अशा लोकांना हा पक्ष हायजॅक केला आहे. आज गोपीनाथराव मुंडे असते तर त्यांनी एसटी कामगारांशी चर्चा करुन, सरकारशी चर्चा करुन एक मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी भडकलेल्या आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला नसता. आधीचे जे भाजपाचे नेते होते त्यांनी अशाप्रकारचं राजकारण केल नसत. आजही भाजपातले जे मूळ, शुद्ध लोक आहेत त्यांच्याशी माझ बोलन होतं, त्यांनाही वाटत की हा प्रश्न एकत्र येऊन सोडवायला हवा”, असे संजय राऊत म्हणाले.