शनिवारी संध्याकाळपासून भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये एक अदृश्य वाद सुरू झाला आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन तोडण्याची भाषा केल्यामुळे त्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या नेत्यांकडून आक्रमक आणि प्रसाद लाड यांना आव्हान देणारी वक्तव्य केली जात आहेत. शिवसेना आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट “प्रसाद लाड यांनी तो प्रयोग करून बघावा”, असं आव्हान दिलं असताना शिवसेनेकडून संजय राऊत नेमकी या प्रकरणावर काय बोलणार? याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, त्यावर बोलताना “यावर आमचे शाखाप्रमुख उत्तर देतील”, एवढंच म्हणून राऊतांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्याला आपण फारसं काही महत्त्व देत नसल्याची सूचक कृती केली आहे.

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी माहीममध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली होती. “नितेशजी (नितेश राणे) पुढच्या वेळी आपण थोडे कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलीसच खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना असं वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर ते देखील करू”, असं विधान प्रसाद लाड यांनी केलं होतं.

“तुम्ही सेना भवन फोडा, आम्ही…”, शिवसेनेनं प्रसाद लाड यांना सुनावलं!

दरम्यान, संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुरुवातीला हा मुद्दा टाळला. मात्र, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी वारंंवार विचारणा केल्यानंतर त्यांनी हा विषयी त्यांनी प्रतिक्रिया देण्याइतपत मोठा नसल्याचंच आपल्या कृतीतून सुचवल्याचं दिसून आलं. “या विषयावर आमचे स्थानिक शाखाप्रमुख प्रतिक्रिया देतील”, असं म्हणून त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं.

“शिवसेना भवन फोडणं हे फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोपं नाही”; शिवसेना आमदाराचा संताप

प्रसाद लाड यांची दिलगिरी

दरम्यान, रात्री उशिरा प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त करणारा एक व्हिडीओ आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये “माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून शिवसेना प्रमुख किंवा त्यांनी बांधलेल्या कोणत्याही वास्तूचा मला अपमान करायचा नव्हता. तरी कुणाचं मन दुखावलं असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो”, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरून भाजपाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याची उत्सुकता राजकीय वर्तुळामध्ये निर्माण झाली आहे.