महाराष्ट्रात महापालिका निवडणुका तीन ते चार वर्षे उशिरा झाल्या. कारण सरकारची हिंमत होत नव्हती निवडणुका घेण्याची. तसंच ज्या पद्धतीने शिवसेना हा आमचा पक्ष फोडला त्यात लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा झाली आणि आता महापालिकांची निवडणूकही पार पडली. मुंबईची निवडणूक महत्त्वाची होती. या निवडणुकीच्या आधी आमचे ४५ नगरसेवक फोडले गेले. असं सांगण्यात येत होतं की आता शिवसेनेचं अस्तित्व राहणार नाही. ठाकरे ब्रांड वाहून जाईल असं सांगितलं गेलं. या लाटांना तडाखे देत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे ७१ नगरसेवक निवडून आले. हा आनंद संघर्षातून मिळालेला आनंद आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी माणूस आजही ठाकरेंच्याच मागे-राऊत
मुंबईत सभागृहात विरोधी बाकावर १०० पेक्षा जास्त नगरसेवक असणं हे सत्ताधाऱ्यांना आव्हान आहे. या निवडणुकीत मराठी माणूस ठाकरेंच्या मागे आहे हे दाखवून दिलं, असं संजय राऊत म्हणाले. भाजपला कुठं जागा मिळाल्या, जिथं परप्रांतीय बहुसंख्य आहेत,ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहिली काय न राहिली काय? ज्यांना मराठी माणसाचं अस्तित्व या राज्याच्या राजधानीत अशा लोकांनी भाजप आणि शिंदेंना मतदान केलं. जो या मुंबईचा भूमिपुत्र मूळ मराठी माणूस आहे तो ठाकरेंच्या मागं राहिले आहेत याचा आनंद आहे, असं संजय राऊत म्हणाले. एवढंच नाही माझ्या हातात सत्ता दिली तर भाजपाचे १५ तुकडे करेन असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तर भाजपाचे १५ तुकडे करेन-संजय राऊत
कल्याण डोंबिवलीत आमचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, ते हरवल्याची तक्रार आम्ही केली आहे. मशाल या चिन्हावर तुम्ही निवडून येता आणि त्यानंतर २४ तासांत तुम्हाला वेगळे कोंब फुटतात तर ही बेईमानी आहे. माझ्यासारख्या माणसाच्या हातात या राज्याची किंवा देशातल्या विशिष्ट खात्यांची सत्ता आली तर भारतीय जनता पार्टीचे १५ तुकडे करुन दाखवेन. भाजपाचे देशभरात १५ तुकडे करेन. हे तुकडे कुठे गेले त्यांना कळणारही नाही. ईडी, सीबीआय आणि पोलीस यांच्या जोरावर सगळं चाललं आहे, स्वतःचं काय आहे? भाजपाचा पूर्ण काँग्रेस झाला आहे. राष्ट्रवादीचे लोक त्यांच्यात आहेत. एकनाथ शिंदेंसारख्या विकृतीच्या लोकांचं अस्तित्व राहणार नाही आमच्या हातात सत्ता आल्यावर. हातात सत्ता असेल आणि अशा प्रकारे काहीही केलं जाऊ शकतं. डोनाल्ड ट्रम्प जसा वेडा झाला आहे तसे ट्रम्पचे बाप इथे बसले आहेत अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.
