मुंबई : राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे दोन्ही उमेदवार गुरुवारी अर्ज दाखल करणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या वेळी उपस्थित राहणार आहेत.  कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला. दुसऱ्या जागेसाठी कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

मराठा समाजातील सामान्य शिवसैनिकाला राज्यसभेची संधी दिल्याचा संदेश संजय पवार यांच्या उमेदवारीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राज्यसभेत विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे ५५ आमदार असून, राष्ट्रवादी व काँग्रेसकडील अतिरिक्त मते तसेच अपक्ष आणि छोटय़ा पक्षांच्या मतांच्या आधारे दुसरी जागा जिंकण्याची शिवसेनेची योजना आहे.

शिवसेनेने छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेच्या उमेदवारीवरून फसवल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला  असला तरी शिवसेना नेते संजय राऊत यांनी तो फेटाळून लावला. शिवसेना संभाजीराजे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी आणि  ४२ मते  देण्यास तयार होती; पण संभाजीराजे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यास नकार दिला. संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीतर्फे २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपकडून २०१६ मध्ये खासदारकी घेतली. मग त्यांना पक्षप्रवेशाचे वावडे असण्याचे काही कारण नव्हते, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी नंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. गुरुवारी मी आणि संजय पवार हे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेसाठी अर्ज भरत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या वेळी उपस्थित राहतील. त्याचबरोबर शरद पवारही उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.