शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फरार घोषित झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केलाय. “आमच्यावर आरोप करायला लावून केंद्र सरकारनेच परमबीर सिंह यांना पळवून लावलंय. कारण केंद्र सरकारच्या मदतीशिवाय कुणालाही देशाच्या सीमा पार करता येत नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. ज्या व्यक्तीने राज्याच्या गृहमंत्र्यांवर भन्नाट आरोप केले आज तो बेपत्ता आहे. त्याला फरार घोषित करावं लागलं, हे मोठं विडंबन असल्याचंही राऊतांनी म्हटलं.

संजय राऊत म्हणाले, “ज्या व्यक्तीने राज्याच्या गृहमंत्र्यांवर भन्नाट आरोप केले आज तो बेपत्ता आहे, त्याला फरार घोषित करावं लागलं. ती व्यक्ती कुठे आहे हे कुणाला माहिती नाही. हे सगळ्यात मोठं विडंबन आहे. जर ते पळून गेले असतील तर त्यात केंद्र सरकारचा हात आहे. केंद्राच्या मदतीशिवाय कुणीही हवाई, समुद्री किंवा रस्त्याच्या मार्गाने देशाच्या सीमा पार करू शकत नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करून त्यांना पळवून लावलंय.”

“भाजपा महाराष्ट्रात दंगली घडवण्याची हिंमत करत आहे”

“अनिल बोंडे यांनी देशात ज्या राज्यात भाजपाचं सरकार आहे तिथं कुणीही दंगली करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा हिंमत करत नाही, असा दावा केला. यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपा महाराष्ट्रात दंगली घडवण्याची हिंमत करत आहे, असं प्रत्युत्तर दिलं. सरकार पाहतंय. मी त्यावर बोलणार नाही. गृहमंत्रालय त्यावर पाहिल,” असंही राऊतांनी नमूद केलं.

“…त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल”

संजय राऊत म्हणाले, “शरद पवार जे बोलत आहेत तो त्यांचा संताप, चीड आणि वेदना आहे. आमच्या मनात एक राग आहे. आम्ही महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार बनवलं ते याच चिडीतून निर्माण झालेलं आहे. सत्तेसाठी काहीही करायचं, केंद्रीय तपास संस्थांचा अमर्याद गैरवापर करायचा, महाराष्ट्रात केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग लोकशाही संकेतांना धरून नाही. शरद पवार यांनी सांगितलंय की तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे आपण इंदिरा गांधी यांच्या काळातही पाहिलंय.”

“तुम्ही पापी लोकं बुरखे घालून फिरता आणि आमच्यावर…”

“छगन भुजबळ यांना नंतर क्लिनचिट मिळाली. मग त्यांनी इतका काळ जो तुरुंगात घातला त्याचं काय? त्याची भरपाई कोण करणार? पवार कुटुंबीय, मी, अनिल देशमुख, छगन भुजबळ, अनिल परब, प्रताप सरनाईक असे फक्त आम्हीच तुम्हाला दिसतोय का? भाजपात किंवा त्यांच्या चमचामंडळात सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? आम्ही तुम्हाला घाबरत नाही, कारण आमचं काहीच पाप नाही. तुम्ही पापी लोकं बुरखे घालून फिरता आणि आमच्यावर आरोप करत चिखलफेक करता. याची किंमत भाजपाला चुकवावी लागेल. आम्ही जो त्रास भोगलाय त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कुणालाही माफ करत नाही,” असं म्हणत राऊतांनी भाजपाला इशारा दिला.