"दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा, असं...", भाजपा आणि आपबाबत संजय राऊत यांचं वक्तव्य | Sanjay Raut serious allegations about AAP and BJP over Gujrat and Delhi MCD election | Loksatta

“दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा, असं…”, भाजपा आणि आपबाबत संजय राऊत यांचं वक्तव्य

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीवर बोलताना भाजपा आणि आपवर गंभीर आरोप केले आहेत.

“दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा, असं…”, भाजपा आणि आपबाबत संजय राऊत यांचं वक्तव्य
नरेंद्र मोदी, संजय राऊत व अरविंद केजरीवाल (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीवर बोलताना भाजपा आणि आपवर गंभीर आरोप केले आहेत. “दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा,” असं भाजपा आणि आपमध्ये साटंलोटं झाल्याची शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली. तसेच तीन विरुद्ध एक असा हा सामना झाला आहे, असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “तीन महत्त्वाच्या निवडणुका झाल्या. बुधवारी (७ डिसेंबर) दिल्ली महानगरपालिकेतील १५ वर्षांची सत्ता आपने खेचून घेतली. बसपा आणि एमआयएमकडून मतविभागणं झाली नसती, तर आपला चांगलं यश मिळालं असतं. तरीही देशाच्या राजधानी दिल्लीत आपला जे यश मिळालं ते कौतुकास्पद आहे. दिल्लीत १५ वर्षांची भाजपाकडून खेचून घेणं सोपं काम नाही.”

“…तर नक्कीच भाजपाला ‘काटे की टक्कर’ द्यावी लागली असती”

“दुसरा गुजरातचा निकाल अपेक्षित आहे. तिकडेही आप आणि काही अन्य पक्षांनी एकत्र येऊन काही आघाडी केली असती किंवा एकमेकांना समजून घेतलं असतं तर नक्कीच भाजपाला ‘काटे की टक्कर’ द्यावी लागली असती.मात्र, दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा असं काही तरी झालं असावं अशी लोकांना शंका आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“तीन विरुद्ध एक असा हा सामना झाला”

“हिमाचलमध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेस चांगली लढत देत आहे. हे चित्र आशादायी आहे. तीन निवडणुकांमध्ये गुजरात भाजपाला मिळालं आहे, दिल्ली हातून गेलीय. हिमाचलला संघर्ष करावा लागतो आहे आणि काँग्रेस जिंकेल. म्हणजे तीन विरुद्ध एक असा हा सामना झाला आहे,” असं म्हणत राऊतांनी भाजपाला टोला लगावला.

“हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता येईल”

संजय राऊत पुढे म्हणाले, “गुजरातमधील यशासाठी भाजपाचं अभिनंदन. दिल्ली महानगरपालिकेत मिळालेल्या यशासाठी मी आपचं अभिनंदन करतो. हिमाचल प्रदेश लहान राज्य असलं तरी तेथे काँग्रेस ज्या पद्धतीने लढते आहे त्यासाठी त्यांचे अभिनंदन करावे लागेल. हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असंच लोकांना वाटतंय. देशाच्या पुढील निवडणुकींसाठी हे आशादायक चित्र आहे.”

“…तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही”

“फक्त विरोधकांनी एकत्र येणं आणि मतविभागणी टाळणं गरजेचं आहे. आपआपसातील मतभेद, हेवेदावे, अहंकार दूर ठेऊन एकत्र लढाई केली तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे हे निकाल आहेत. सगळे एकत्र येऊन लढले तर गुजरातमध्येदेखील लोकसभा निवडणुकीतही परिवर्तन होईल,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“”राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडू नये”

संजय राऊत पुढे म्हणाले, “राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडू नये असं मला वाटतं. राहुल गांधी वेगळ्या मिशनवर आहेत. या निवडणुकांचा संदर्भ त्यांच्या यात्रेशी जोडणं चुकीचं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेस अंतर्गत आणि इतर राजकारणापासून राहुल गांधी दूर आहेत. ते एक वेगळी मोहिम पुढे नेत आहेत.”

हेही वाचा : Gujarat Election Results 2022 Live :…हे लोकशाहीसाठी घातक, नाना पटोलेंनी मांडलं स्पष्ट मत; वाचा प्रत्येक अपडेट

“या निकालाचा संबंध जबाबदाऱ्या असलेल्या काँग्रेस अध्यक्षांशी जोडावा”

“राहुल गांधी देश जोडणं, देशातील द्वेष नष्ट करणं, लोकांची मनं जोडणं, संघर्ष थांबवणं यासाठी भारत जोडो यात्रा करत आहेत. त्या यात्रेला चांगलं यश मिळत आहे. त्यामुळे त्या यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडणं मला पटत नाही. या निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष आणि इतर लोकांना जबाबदाऱ्या होत्या. त्यांच्याशी या निकालाचा संबंध जोडला जाऊ शकतो,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 11:39 IST
Next Story
“हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता येईल आणि गुजरातमध्ये…”, संजय राऊत यांचं मोठं विधान