गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. “शिवाजी महाराज हे जुने आदर्श झाले, आजचे आदर्श नितीन गडकरी आणि शरद पवार आहेत”, असं राज्य पाल म्हणाले होते. त्यापाठोपाठ भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनीही शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आता ठाकरे गटाकडून त्यावर आक्रमक भूमिका घेतली जात आहे. उद्धव ठाकरेंनी सगळ्यांनी एकत्र येऊन आंदोलन उभं करण्याचे संकेत दिल्यानंतर त्यासंदर्भात आज माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे. शिवाय, यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरही तोंडसुख घेतलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“दोन पक्षांतर केलेल्या नेत्यांचं हे नातं”

मुंबईत आसाम भवनासाठी जागा देण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. त्यावरून संजय राऊतांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. “महाराष्ट्रातलं खोके सरकार आणि आसामचं काय नातं अचानक निर्माण झालंय माहिती नाही. आसामचे मुख्यमंत्री हे तसे मूळचे काँग्रेसवाले. तेही पक्षांतर करूनच भाजपात गेले आणि मुख्यमंत्री झाले. आत्ताचे आपले मुख्यमंत्रीही त्याच पद्धतीचे. त्यामुळे दोन पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचं नातं जुळलं असेल. पण मुंबईत आता जागा नाही. नवी मुंबईत आसाम भवन आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“असे आक्रित इंग्रज काळातही घडले नाही, काळ मोठा…”, संजय राऊतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; पंतप्रधानांचाही केला उल्लेख!

“आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ४० आमदारांना कामाख्या मंदिराच्या दर्शनाला बोलावलं असा या आमदारांचा दावा आहे. आम्हाला कधी बोलवलं नाही. कारण आम्ही पक्षांतर केलं नाही. कामाख्या देवीची आख्यायिका अशी आहे की ती न्यायदेवताही आहे. त्यामुळे जे ४० लोक तिथे गेले आहेत, त्यांच्यासोबत ती देवी न्याय करेल. महाराष्ट्रावर अन्याय करून हे ४० लोक तिथे गेले आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की कामाख्या देवी नक्की न्याय करेल”, असा टोलाही संजय राऊतांनी यावेळी लगावला.

राज्यपाल कोश्यारींविरोधात आक्रमक होणार?

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून ठाकरे गट आक्रमक होणार असल्याचे संकेत यावेळी संजय राऊतांनी दिले. “संभाजीराजे छत्रपती किंवा उदयनराजेंची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे. महाविकास आघाडीने सातत्याने या विषयावर आवाज उठवायचं काम चालू ठेवलं आहे.उद्धव ठाकरेंनी त्याबाबत एक अल्टिमेटम दिला आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपाकडून ज्या पद्धतीने अपमान केला जात आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत, या सगळ्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं. मला वाटतं की लवकरच त्याबाबत कठोर पावलं उचलण्याबाबत निर्णय होईल”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut shivsena slams cm eknath shinde on governor bhagatsingh koshyari statement pmw
First published on: 27-11-2022 at 10:39 IST