मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज्यांबरोबर टिपू सुलतानची तुलना होऊ शकत नाही. तो एक योध्दा होता. इंग्रजांबरोबर लढला आणि त्यात मृत्यूमुखी पडला. तो टिपू सुलतान पाकिस्तानचा नायक आहे. त्याचे पाठ्यपुस्तकात धडे आहेत. पाकिस्तानात पुतळे आहेत. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे सामने खेळलेले चालतात का, असा रोखठोक सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.

भारत पाकिस्तान सामन्यात कोट्यावधीचा जुगार खेळला जातो. त्यातील काही हिस्सा सरकार मधील नेत्यांना मिळतो म्हणून या सामन्यांचा साधा निषेध केला जात नाही, अशी गंभीर टीका त्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान वादावर हर्षवर्धन सकपाळ उत्तर देतील पण भाजपचा एकही कार्यकर्ता भारत पाकिस्तान क्रिक्रेट सामन्यावर बोलत नाही. या सामन्यातून गेल्या वेळी २५ हजार कोटी पाकिस्तान मध्ये गेले. त्यातील काही रक्कम भाजपच्या नेत्यांना मिळाली. या क्रिकेट सामन्यावर नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस शांत आहेत. टिपू सुलतानला मानणारे अनेक नेते भाजप सोबत आहेत. भाजप बरोबर गेल्यावर ते शुध्द झाले का? क्रिकेटचा हा मुद्दा इतरत्र भरकटवण्यासाठी पुण्यात महाराज- सुलतान वाद सुरु करण्यात आला आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

नार्वेकर अडचणीत येतील

अलिबाग येथील राहुल नार्वेकर प्रकरणावर मी जास्त बोललो तर नार्वेकर यांना राजीनामा द्यावा लागेल. क्वालिटी काऊंसिल ऑफ इंडिया चे अध्यक्ष शाह यांनी अलिबाग मधील हजारो एकर जमिन विकत घेतली आहे. मी अलीबागचा मूळ रहिवासी आहे. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी. मला सर्व माहित आहे.

गुजरात लाॅबीसाठी कोण दलाली करत होते. त्याचा शोध घ्या. अलिबाग गुजरात लाॅबीला विकण्याचा घाट रचला गेला आहे, असा आरोप राऊत यांनी केला. मुंबई मधील सर्व प्रकल्पांचे बांधकाम हे बाहेरचे कंत्राटदार करीत आहेत. त्यांना मुंबईची काहीच माहिती नाही. सर्वत्र मुंबई खोदून ठेवली आहे. मुलुंड येथील एका रामभक्ताचा बळी हा भाजप सरकारचे पाप आहे अशी टीका त्यांनी मुलुड येथील मेट्रो स्लॅब कोसळल्या प्रकरणी केली