मुंबई : घराणेशाहीवरून इतरांवर चिखलफेक करणाऱ्या भाजपला सुनेत्रा पवारांच्या निवडीनंतर काल ‘मोक्ष’ प्राप्त झाला, अशी टीका करताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व पुन्हा ‘पटेलां’कडे (प्रफुल्ल पटेल) जाऊ नये, अशी काळजी सुनेत्रा पवारांनी घ्यावी, असा सल्लाही दिला.
अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले की सातत्याने ठाकरेंच्या आणि गांधींच्या घराणेशाहीवर टीका करतात. मात्र, सुनेत्रा पवारांचे अभिनंदन करून त्यांनी स्वतःला या आरोपातून मुक्त केले आहे. भाजपने आता घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, काल त्यांना या आरोपातून मोक्ष मिळाला, असे संजय राऊत म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानाचा संदर्भ देताना राष्ट्रवादी काँग्रेस हा रांगड्या माणसांचा आणि मराठी अस्मितेचा पक्ष आहे. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत कधीही तडजोड केली नाही. ते भाजपच्या ताटाखालचे मांजर होणे अनेकदा टाळत होते. हा पक्ष पाटील आणि भोसल्यांचा आहे, तो पटेलांचा होऊ देऊ नका. सत्तेची सूत्रे मराठी चेहऱ्याकडेच राहावीत याची काळजी सुनेत्रा पवारांनी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
जर शरद पवारांच्या मनात असते, तर अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. पण तेव्हाची राजकीय परिस्थिती वेगळी होती. शरद पवार कधीही राजकारण ताणून धरत नाहीत, ते संयमाची भूमिका घेतात. मात्र, मुख्यमंत्री व्हायला भाग्य लागते. भाजपच्या काळात अनेक क्षमता नसलेले लोक ‘होयबा’गिरी करून मुख्यमंत्री झाले, पण अजित पवार कधीच कुणाचे ‘होयबा’ झाले नाहीत, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी अजित पवार यांच्या मुख्यंमत्रीपदाच्या स्वप्नाबाबत व्यक्त केली.
शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी ही अजितदादांची इच्छा होती. दोन्ही पक्ष एकत्र यावेत यासाठी अनेक बैठका झाल्याची माहिती आमच्याकडेही होती. अजितदादांच्या मनात शरद पवारांविषयी शेवटपर्यंत कमालीचा आदर आणि ओलावा होता. धाक, दहशत आणि दबावतंत्र अवलंबून त्यांना पक्ष सोडायला भाग पाडले गेले. तरीही त्यांना वाटत होते की जे झाले ते बरे नाही. काही लोकांच्या ‘दुकानदाऱ्या’ बंद होतील, या भीतीनेच त्यांनी हे विलीनीकरण होऊ दिले नाही, असा दावाही त्यांनी केला.

