Sanjay Raut on Ritu Tawade : मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपाने रितू तावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ११ फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत त्या बिनविरोध निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच त्यांनी मुंबईतून बांगलादेशींना हाकलून लावण्याचे आश्वासन मुंबईकरांना दिलंय. यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली.
रितू तावडे काय म्हणाल्या?
मला इथं प्रत्येक मुंबईकरासाठी काम करायचं आहे. जर मुंबईकरांची इच्छा आहे की त्यांना चालायला फुटपाथ नाही तर त्यांच्या मनात यावरुन रोष आहे. मुंबईकर हे टॅक्स पेअर आहे. मुंबईकर अलर्ट आहेत, शिक्षित आहेत, संवेदनशील आहेत. त्यांना असं वाटतंय की, आम्हाला रस्त्यावरुन चालायचंय पण आम्हाला रस्ताच उपलब्ध नाही. मग या रस्त्यांवर कोणी अतिक्रमणं केली आहेत, तर बांगलादेशी रोहिंग्यांनी! त्यामुळं जर मुंबईला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला या लोकांना इथून बाहेर काढावं लागेल आणि ही आमची प्राथमिकता आहे, असं रितू तावडे म्हणाल्या.
रितू तावडे यांच्या या विधानावर आता संजय राऊतांनीही पलटवार केला आहे. संजय राऊत एक्स पोस्टमध्ये म्हणाले, “मुंबईच्या होणाऱ्या महापौर ऋतू तावडे यांनी मुंबईतून बांगलादेशींना घालण्याची घोषणा केली! छान.”
“फक्त त्यांनी एक करावे पंतप्रधान मोदी यांना दिल्लीत जाऊन विचारावे की कालच्या अर्थसंकल्पात बांगलादेशला कोट्यावधी रुपयांचे दान का दिले? बांगलादेशातील हिदू मंदिरांवर हल्ले करण्यासाठी आणि हिंदूंच्या कत्तली करण्यासाठी हे दान दिले काय?” असा थेट सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती, संजय राऊतांचा थेट मोहन भागवत यांना सवाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दोन दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान उपस्थित राहिल्याची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या दरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी थेट मोहन भागवत यांना काही प्रश्न विचारले आहेत.
फक्त एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून सलमान खानला व्यासपीठावर घेतलं की इतर मुस्लिमांना देखील संघात प्रवेश देणार? असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. संघाच्या कार्यक्रमात सलमान खानच्या उपस्थितीवर संजय राऊत म्हणाले की, “काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रम झाला. मलाही आमंत्रण होतं, पण मला दुसर्या एका कार्यक्रमाला जायचं असल्यानं मी गेलो नाही, नाहीतर मीही गेलो असतो. सलमान खान व्यासपीठावर होते असं मला कळलं. हे सलमान खानचं स्वागत होतं? एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे? फक्त सलमान खान या नटाला व्यासपीठावर आमंत्रण होतं की संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का? हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं. कारण ज्या पद्धतीने हिंदू-मुसलमान असा द्वेष आणि सूडपूर्ण प्रसार गेल्या काही काळापासून केला जात आहे त्यामध्ये संघही सामील आहे.”

