शिवसेनेचे खासदार संजय राऊत शुक्रवारी (१ जून) खासदार श्रीकांत शिंदेंबाबत विचारलेल्या प्रश्नानंतर भरपत्रकारसभेत थुंकल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. यानंतर त्यांच्या या कृतीवर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या. भाजपाचे आमदार नितेश राणेंनी तर संजय राऊतांवर अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आता स्वतः संजय राऊतांनीच पत्रकार परिषदेतील या प्रकारावर भाष्य केलं. तसेच ते भरपत्रकार परिषदेत का थुंकले याचं कारण सांगितलं.

संजय राऊत म्हणाले, “माझ्या जीभेला त्रास होतो. शस्त्रक्रिया झाल्याने दात जीभेला लागतो. त्यामुळे मला बोलता बोलता थुंकावं लागलं. त्याचा माध्यमं वेगळा अर्थ काढत आहेत.”

“मी त्यांच्यावर थुंकलो नसलो, तरी जनता त्यांच्यावर थुंकत आहे”

“मी त्यांच्यावर थुंकलो नसलो, तरी हे खरं आहे की, जनता त्यांच्यावर थुंकत आहे. हा सर्व प्रकार महाराष्ट्राने त्यांच्यावर थुंकण्याचाच प्रकार आहे. भविष्यात महाराष्ट्र त्यांच्यावर कसा थुंकतो हे सर्वांना दिसेल. माध्यमांनी त्याचा संबंध माझ्याशी जोडू नये,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : ‘या’ खासदाराचं नाव ऐकताच संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले, नेमकं काय घडलं वाचा!

नेमकं काय घडलं होतं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ठाकरेंना उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील असं श्रीकांत शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला. संजय राऊतांनी प्रश्न ऐकून घेतला आणि विचारले असं कोण म्हणालं. तेवढ्यात पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतलं. श्रीकांत शिंदेंचं नाव ऐकताच संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले. त्यांच्या या कृतीमुळे पत्रकारांनी श्रीकांत शिंदेचा प्रश्न तिथेच संपवला आणि पुढच्या विषयांवर चर्चा सुरू झाली.