अमरावती दंगल; फडणवीसांनी काड्या करू नये : संजय राऊत

विरोधी पक्ष नेते फडणवीस राज्याचे गृहमंत्री होते, त्यांनी आगीत तेल न टाकता शांत राहण्यासाठी काम केलं पाहिजे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमरावती हिंसाचारावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजपावर सडकून टीका केलीय. तसेच फडणवीसांनी वादग्रस्त वक्तव्य करून काड्या करू नये, असं मत व्यक्त केलंय. हे ठाकरे सरकार आहे. महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. येथे कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहिला जात नाही, असंही यावेळी त्यांनी नमूद केलं. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

संजय राऊत म्हणाले, “हे ठाकरे सरकार आहे. इथे कारवाई करताना गट तट पक्ष पहिला जात नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी आगीत तेल न टाकता अमरावतीसारख्या घटना घडू नयेत यासाठी शांत राहण्यासाठी काम केलं पाहिजे. अमरावतीसारख्या घटनांचं राजकारण, पेटवापेटवी महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हा काही दंगलीसाठी ओळखला जाता कामा नये. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे.”

” अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली हे सर्वांना माहिती”

“तुम्ही पाहिलं तर अमरावतीच्या शेजारी गडचिरोलीत याच पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. कायद्यासमोर सगळे समान आहेत. अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली, कोणत्या कारणाने पेटवली, त्यामागे कोण होतं हे देशालाही माहिती आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनाही माहिती आहे आणि अमरावतीमधील जनतेलाही माहिती आहे. वातावरण सगळं शांत झालं असताना उगाचच काड्या करण्याचं काम ना इकडल्यांनी, ना तिकडल्यांनी कोणीही करू नये एवढंच मी महाविकासआघाडीतर्फे त्यांना आवाहन करेल,” असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला.

हेही वाचा : कंगनाच्या महात्मा गांधींबाबतच्या वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “पंतप्रधान मोदीसुद्धा गांधींच्या….”

“अमरावतीत गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली का?”

यशोमती ठाकूर यांनी गुप्तचर यंत्रणा अपयश ठरल्याचं मान्य केलं. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा जिल्हाधिकारी नव्हते, पोलीस नव्हते. सरकारमधील काही मंत्र्यांनाच तसं वाटतंय असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “कधी कधी इंटेलिजन्स फेल होतं. शेवटी तेही माणसंच आहेत. देशभरात अनेक घटनांबाबत इंटेलिजन्स फेल होत असतं. काश्मीर, त्रिपुरामध्ये देखील होतं. असं असलं तरी अमरावतीतील दंगल नियंत्रणात आणली. आज अमरावतीत शांतता नांदत आहे हे महत्त्वाचं आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay raut verbal attack on devendra fadnavis over amravati riots violence pbs

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा