scorecardresearch

प्रकल्पाजवळ जमिनी घेणाऱ्यांची यादी जाहीर करू; संजय राऊत यांचा इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी येथील सभेत तेलशुद्धीकरण प्रकल्पास विरोध करणाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या

sanjay raut reaction on devendra fadnavis
भाजपाने आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देऊ केलं होते. तेव्हा त्यांनी ते दिलं नाही. आता अडीच वर्ष मिंधे गटाची टेस्टट्यूब बेबी मांडीवर घेऊन बसले आहेत. त्याचं उत्तर आधी फडणवीसांनी द्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी येथील सभेत तेलशुद्धीकरण प्रकल्पास विरोध करणाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या झाली, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केला.

याप्रकरणी सखोल चौकशी होऊन खऱ्या सूत्रधारांचा छडा लागेपर्यंत आम्ही आवाज उठविणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. प्रकल्प परिसरात अनेक व्यापाऱ्यांनी कवडीमोल किमतीत जमिनी घेतल्या असून त्यांची यादी जाहीर करण्याचा इशारा राऊत यांनी दिला.कोकणात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश नाईक आणि आता वारिसे यांची हत्या झाली. सरकार बदलताच कोकणात हत्येचे सत्र सुरू झाले असल्याचा आरोप करून राऊत म्हणाले, आरोपींनी आतापर्यंत किती सुपाऱ्या घेतल्या, कोणाच्या हत्या केल्या, याचा शोध घेतला पाहिजे. वारिसे काही नेत्यांच्या डोळय़ांत खुपत होते. त्यांना आधीही धमक्या आल्या होत्या. वारिसे यांची हत्या करणाऱ्या आरोपीमागील खरे सूत्रधार कोण, याची सखोल चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या आसपास ज्यांनी कवडीमोल किमतीत जमिनी घेतल्या, त्यांची माहिती देण्यास वारिसे यांनी सुरुवात केली होती. प्रकल्प समर्थक, सरकारमधील काही व्यक्तीआणि रत्नागिरीतील काही राजकारणी यांचे जमिनी लाटण्यात साटलोटे आहे. परप्रांतीयांबरोबर अब्जावधी रुपयांचे व्यवहार झाले असून जमिनी घेणाऱ्यांची यादी जाहीर करण्याचा इशारा राऊत यांनी दिला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 03:34 IST
ताज्या बातम्या