राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “अत्यंत दुर्दैवी आणि चिंता वाटावी असा हा आजचा प्रकार आहे. एसटी संपाच्या बाबतीत या सरकार मार्ग काढण्यासाठी मागण्या मान्य करण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहे. न्यायालायचा निर्णय देखील त्याच पद्धतीचा आहे. बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या अशी माझी माहिती आहे. तरी देखील कुठली तरी एक अज्ञात शक्ती, पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा आणि एका विशिष्ट गटाला चिथावणी देऊन माथी भडकावून, अशाप्रकारे आजचं जे कृत्य केलं आहे, अशी कृत्यं घडावीत यासाठी सातत्याने हालचाली करत आहे.”

तसेच, “महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं राज्य ज्यांच्या डोळ्यात खूपतय, त्यामुळे ज्यांच्या पोटात दुखतय असे काही लोक ही कृत्य घडवू पाहत आहेत. शरद पवार यांच्या सारख्या नेत्याच्या घरावर, शरद पवार हे एक संसदीय लोकशाही मानणार नेते आहेत. आंदोलनं, निदर्शनं, मोर्चे हा जनतेचा हक्क आहे, असं मानणाऱ्या नेत्यांपैकी ते आहेत. हे मला माहिती आहे, बाळासाहेब ठाकरे देखील याच भूमिकेचे नेते होते. जनतेचा जो आवाज आहे तो समोर येण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी आंदोलन हे होतं असतं. पण ज्या पद्धतीचं आंदोलन आज मी पाहिलं. ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे तिथे निर्भयपणे गेल्या आणि त्या आंदोलकांशी चर्चा करत होत्या, त्यांना हात जोडून त्या विनंती करत होत्या तरी देखील समोर ज्या प्रकारची भाषा आणि वर्तन सुरू होतं, हे लोकशाहीतल्या कोणत्याही आंदोलनाला शोभणारं नाही. यांचे नेते कोण आहेत हे पाहावं लागेल. या नेत्यांचे संस्कार काय? ते पाहावे लागेल. महाराष्ट्रात अशाप्रकारच्या आंदोलनाला मान्यता आणि स्थान असणार नाही. आम्ही देखील आंदोलनं केली आहेत, लोखोंच्या संख्येने आंदोलनं केली आहेत. आंदोलनात आम्ही संघर्ष केलेला आहे.” असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.