राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता ईडीच्या रडावर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, तपास यंत्रणांना सूचक इशारा देखील दिला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “ नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत, जे सातत्याने बोलत आहेत. असत्य उघड करत आहे, मुखवटे उलगडून काढत आहेत. सत्य बोलत आहेत. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी,सीबीआय वैगरे लावलं जात आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीची लोक घरी आले आणि घेऊन गेले. ठीक आहे, चौकशी होईल आम्ही वाट बघतोय. नक्कीच ते संध्याकाळी घरी येतील. आताच माझं सगळ्यांची वरिष्ठ स्तरावर बोलणं झालं आहे.”
तसेच, “महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपासयंत्रणा घरी येऊन घेऊन जातात. चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची, म्हणजे चौकशी पण कशी २०-२० वर्षानंतर ते करत आहेत. २०-२५ वर्षापूर्वीचं प्रकरण. पण किरीट सोमय्या यांनी काही प्रकरण ईडीकडे दिलेली आहेत. भाजपा नेत्यांची म्हणजे आज जे भाजपात मंत्री आहेत, पदावर आहेत, केंद्रीय मंत्री आहेत त्यांची अनेक प्रकरणं. भ्रष्टाचाराविरोधात लढणारे महात्मा हा शब्द चांगला आहे, कारण त्यांना मी काही बोललो तरी वाटतं मी शिवी दिली. जे महात्मा आहेत, त्यांनी ईडी कडे अनेकांची प्रकरणं दिलेली आहेत, त्यांना का समन्स गेलं नाही? त्यांच्या घरी ईडी का नाही पोहचली?” असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ‘ईडी’च्या रडारवर ; पहाटेच पथक घरी धडकलं!
याचबरोबर, “आता ही सगळी प्रकरणं आम्ही परत एकदा ईडीकडे घेऊन जाणार आहोत. तक्रार कशी करायची हे आम्हाला माहिती आहे. ज्या तक्रारी अगोदर केलेल्या आहेत, त्याचं काय झालं? का ते फक्त समन्स, ईडीचे पथकं ही केवळ महाविकास आघाडी किंवा तृणमूल काँग्रेस, अखिलेश यादव यांचा पक्ष, लालू प्रसाद यादव यांचा पक्ष यांच्या पुरतेच मर्यादित आहे. की त्यांच्यासाठी या संपूर्ण केंद्रीय तपास यंत्रणांची रचना आणि नियुक्ती झालेली आहे? हे पाहू. २०२४ पर्यंत हे सगळं चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत.” असा सूचक इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.
याशिवाय, “ आम्ही घाबरत नाही ही लढाई सुरू राहील. त्यांना येऊ द्या तपास करू द्या, कितीही खोटं करू द्या. बनावट करू द्या. शेवटी सत्याचा विजय या देशात होत असतो आणि प्रत्येक गोष्टीवर आमचं लक्ष आहे. आताच माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. अनेक विषयांवर चर्चा झाली. सोप नाहीए, २०२४ ज्या गोष्टी घडणार आहेत त्याची तयारी या तपास यंत्रणांनी ठेवावी.” असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.