scorecardresearch

ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या संपर्कात? आमदाराच्या दाव्याने खळबळ; म्हणाले, “ते लवकरच…”

विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

sanjay shirsat claim on milind narvekar
संग्रहित छायाचित्र

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून आज पहिल्या दिवशी ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर हे आमदार नसतानाही सभागृहात बसल्याचे आढळून आलं. यावरून विविध राजकीय चर्चा सुरू असताना नार्वेकर हे आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – शिवसेनेनं ५५ आमदारांना बजावला व्हीप, ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा…”

काय म्हणाले संजय शिरसाट?

मिलिंद नार्वेकरांनी सभागृहात जाण्यासाठी कोणाची परवानगी घेतली असेल. पण अनेक वर्षांपासून त्यांची आमदार व्हायची इच्छा आहे. त्यामुळे ते आता मार्ग शोधत आहेत. आमच्या माहितीनुसार उद्धव ठाकरेदेखील त्यांना आता जवळचे मानत नाहीत. ते कदाचित लवकरच सभागृहात येतील, असा त्यांचा प्रयत्न आहे. मिलिंद नार्वेकर आणि इतर काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.

हेही वाच – “करोनात हे आपल्या करीनाबरोबर घरात होते”, प्रकाश महाजनांच्या विधानावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमच्या भावावर…”

उद्धव ठाकरेंना लगावला टोला

दरम्यान, काल विरोधकांनी वर्षा बंगल्यावरील चहा-पाण्याच्या खर्चावरून शिंदे सरकारवर टीका केली होती. या टीकेलाही संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. या खर्चाची आम्हाला जाणीव आहे. परंतू भेटायला येणारा कार्यकर्ता, शेतकरी, राज्यातील सामान्य नागरीक हा चहा-पाण्याशिवाय जाऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. यात काहीही वावगं नाही, असे ते म्हणाले. तसेच आधीचे मुख्यमंत्री आमदारांना भेटतच नव्हते, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला भेटण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून त्यांचा खर्चही कमी होता, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 13:14 IST