मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या आराखड्याच्या सादरीकरणादरम्यान रहिवाशांना धमकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याविरोधात अखेर मोतीलाल नगर विकास समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली. रहिवाशांसोबत गैरवर्तन करणाऱ्या जयस्वाल यांच्याविरोधात कठोर कारवाई करून त्यांची तातडीने म्हाडातून बदली करण्याची मागणी समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या आराखड्याच्या सादरीकरणादरम्यान शुक्रवारी जयस्वाल यांचा आवाज चढला. त्यांनी एका तरूणाला त्याच्या दाढीवरून थेट घुसखोर ठरवून त्याला उचलून नेण्याची भाषा केली. तर पुनर्विकासाला तुमचा विरोध असेल तर पुनर्विकास थांबवतो, पण त्यानंतर तुम्हाला घरे कशी मिळतात यासह अनेक प्रकारे त्यांनी रहिवाशांना धमकावण्याचा प्रयत्न केला. जयस्वालांच्या या गैरवर्तनाविरोधात मोतीलाल नगरवासियांमध्ये रोष आहेच, पण त्याचवेळी समाज माध्यमातूनही त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, मोतीलाल नगर विकास समितीने मंगळवारी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून जयस्वाल यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांची म्हाडातून तात्काळ बदली करावी, या प्रकरणाची चौकशी करावी यासह अन्य मागण्या या पत्रात करण्यात आल्या आहेत. तर मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचीही मागणी केली आहे.

मोतीलाल नगर जनकल्याण समिती, मोतीलाल नगर रहिवाशी विकास संघ आणि मोतीलाल नगर पुनर्विकास समन्वय समिती या तीन संघटनांनी १६०० चौ. फुटाचे (कार्पेट क्षेत्र) घर देण्याच्या जयस्वाल यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. त्यांचे आभार मानले आहेत. तसेच सादरीकरणादरम्यान काहींनी अनावश्यक गोंधळ घातला, सकारात्मक चर्चेला बाधा आणली, असा आरोप या संघटनांनी केला आहे. आम्हाला पुनर्विकास हवा आहे, पण काही जण स्वहितासाठी प्रकल्पाला विरोध करीत असल्याचाही आरोप या संघटनांनी केला.