मुंबई : कंत्राटदाराने महानगरपालिका प्रशासनाला अंधारात ठेवून आवश्यक ते निकष पायदळी तुडवून सांताक्रुझ पूर्व येथील शौचालयाचे ”आकांक्षी वातानुकूलित शौचालय” असे नामकरण केल्याचे नुकतेच निदर्शनास आले. नागरिकांकडून याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागताच पालिकेने संबंधित कंत्राटदाराला पत्र पाठवून तातडीने नाव बदल्यण्याची सूचना दिली. ते बदलून आता शौचालयाला मंगल शौचालय असे नाव देण्यात आले आहे.

सांताक्रुझ पूर्व येथे २०११ साली ”पैसे द्या आणि वापरा” तत्वावर शौचालय बांधण्यास महापालिकेने कंत्राटदाराला मंजुरी दिली. त्यांनतर संबंधित ठिकाणी शौचालय बांधण्यात आले. त्या शौचालयाची ३० वर्षांच्या कालावधीसाठी देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली. गेल्या काही महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने शौचालयाच्या दर्जोन्नतीसाठी पालिकेकडे विचारणा केली. महापालिकेने मंजुरी दिल्यानंतर या शौचालयात वातानुकूलित यंत्रणा बसवून त्याला ‘मंगल वातानुकूलित शौचालय’ असे नाव देण्यात आले.

शौचालयातील वातानुकूलित यंत्रणेबाबतच्या संकल्पनेचे अनेकांनी कौतुक केले. मात्र, काहींनी त्यावर टीका करत पालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. अन्य शौचालयांची स्थिती सुधारण्यासाठी महापालिका गांभीर्याने विषय हाताळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मुंबईत अनेक ठिकाणच्या ”पैसे द्या आणि वापरा” तत्वावरील शौचालयांमध्ये पुरेशी स्वच्छता बाळगली जात नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. दरम्यान, मंगल शौचालयाच्या नामफलकावर नमूद ”आकांक्षी वातानुकूलित शौचालय” यावरही अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

मुंबईत कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना व पर्यटकांना स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आकांक्षी शौचालये बांधण्याचे पालिकेचे नियोजन आहे. ‘स्वच्छ भारत अभिनयना’अंतर्गत मुंबईत काही ठिकाणी आकांक्षी वातानुकूलित शौचालये बांधण्यात येत आहेत. या शौचालयासाठी वेगळे नियम, अटी असून त्यात अधिक सुविधा असतात. मात्र, शौचालयात केवळ वातानुकूलित यंत्रणा असताना त्याला ‘आकांक्षी वातानुकूलित शौचालय’ असे नाव देण्यात आल्याने नागरिकांनी आक्षेप घेतला. याप्रकरणी आता कंत्राटदाराकडून खुलासा मागविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच, फलकावरील ‘आकांक्षी’ हे नाव काढून टाकण्याची सूचना पालिकेने कंत्राटदाराला केली आहे.

आकांक्षी वातानुकूलित शौचालयांची वैशिष्ट्ये

कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक व पर्यटकांसाठी स्वच्छतागृह सुविधा

२४ x ७ स्वच्छ आणि स्वच्छतापूर्ण शौचालये

स्वयंसेवी संस्थांमार्फत देखभाल

परवडणाऱ्या दरात पिण्याच्या पाण्याची सुविधा

वीज बचतीसाठी सौरऊर्जेचा वापर

महिलांसाठी मासिक पाळी व अन्य स्वच्छतेच्या गरजांसाठी सुविधा

हँड ड्रायर व हँड सॅनिटायझर

बँकेचे एटीएम, सलून इत्यादी पूरक सुविधा

शक्य असल्यास इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्र

जाहिरातींसाठी होर्डिंगची व्यवस्था

महिलांसाठी चेंजिंग रूम व बाळाला दूध पाजण्यासाठी स्वतंत्र कक्ष