मुंबई : सांताक्रूझमध्ये गटाराची सफाई करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरलेल्या दोन कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ही घटना संताक्रूझ पूर्व येथील गोळीबार रोड क्रमांक ८ येथे घडली. या दुर्घटनेतील दुसऱ्या कामगारावर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सोसायटीअंतर्गत सांडपाणी वाहिनीच्या सफाईसाठी सोसायटीने हे दोन खासगी कामगार नेमले होते.

सांताक्रूझ येथील गोळीबार रोड क्रमांक ८ येथील भव्या निकेतन या सोसायटीने इमारतीच्या अंतर्गत सांडपाणी वाहिनीची सफाई करण्याचे काम खासगी कंत्राटदाराला दिले होते. कंत्राटदाराने या कामासाठी दोन कामगार आणले होते. दोघेही मुंबई महापालिकेचे कर्मचारी नव्हते. सोसायटीच्या आवारातील अंतर्गत सांडपाणी वाहिनीची सफाई सुरू असताना संबंधितांनी महापालिकेला कोणतीही माहिती न देता पालिकेचे मॅनहोल उघडले. दोघे मॅनहोलमध्ये उतरून सफाई करत असताना विषारी वायूमुळे गुदमरून दोघेही कामगार बेशुद्ध झाले.

त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांना मॅनहोलमधून बाहेर काढून व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यापैकी एकाला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. दुसऱ्या व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी या घटनेची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागाला दिली.

दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने याबाबत माहिती दिली की, सोसायटीची सांडपाणी वाहिनी तुंबली होती. त्यामुळे घाणीचे पाणी रस्त्यावर येत होते. या सांडपाणी वाहिनीचे मॅनहोल सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर होते. त्यामुळे ते उघडण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयाला कळवायला हवे होते. मात्र, तसे न करता सोसायटीने परस्पर खासगी कंत्राटदार बोलवल्यामुळे सोसायटीवर कारवाई करायला हवी अशी मागणी या प्रत्यक्षदर्शीने केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस व १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाली होती. मृत व जखमी दोघांचीही ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, साकीनाका येथे २ जुलै रोजी उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख या पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मॅनहोल नेमका कोणी व का उघडे ठेवले याचा अद्याप पालिका प्रशासनाला शोध लागलेला नाही. तसेच पालिकेच्या परवानगीशिवाय मॅनहोल उघडण्यास मनाई असताना वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे कामगारांचे व पादचाऱ्यांच्याही जिवाला धोका निर्माण होत आहे.