मुंबई : सांताक्रूझ येथील रिलीफ मार्गावरील रहेजा महाविद्यालयाशेजारी गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास झाड पडल्याची घटना घडली. त्या दुर्घटनेत आठजण जखमी झाले. रुग्णालयात उपचार करून सर्व जखमींना घरी पाठविण्यात आले. दरम्यान, मुंबईत गुरुवारी झाड व फांद्या पडल्याच्या ९१ घटना घडल्या. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सांताक्रूझ येथील खासगी इमारतीच्या आवारात एक झाड पडल्याची माहिती महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली. त्या झाडाची पाहणी करण्यासाठी काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्याचवेळी बाजूचे आणखी एक झाड अचानक पडले. त्यात नूर आलम (२६), राजेश कुडाळकर (५१), विनय कदम (३८), सुलेमान शेख (२८), विनोद भट (४६), देवर्षी सिंह (२८) जगदीश निकम (२८), निलाद तुळे (६७) आदी जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या नानावटी रुग्णालयात नेण्यात आले. तसेच, गुरुवारी सकाळी चर्चगेट स्थानकाजवळील बी रोडवरही भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने काही वाहनांचे नुकसान झाले.
दरम्यान, १ जुलै सकाळी ८ ते २ जुलै सकाळी ८ या २४ तासांत झाड आणि फांद्या पडण्याच्या तब्बल ९९ घटना घडल्या. तसेच, गुरुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेतही शहरात १३, पूर्व उपनगरात २२ व पश्चिम उपनगरात ५६ अशा एकूण ९१ ठिकाणी झाड, फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. चेंबूरमध्ये मंगळवारी शाळेच्या बसवर झाड पडून एका विद्यार्थांचा मृत्यू झाला. त्यानंतरही शहरात झाड, फांद्या पडण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी शहरात सात, पूर्व उपनगरात एक व पश्चिम उपनगरात एक अशा एकूण नऊ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. तसेच, शहर व उपनगरांमध्ये एकूण चार ठिकाणी घराचा भाग, भिंत पडल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली.
