Santosh Dhuri On Raj Thackeray: राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं. मुंबई महापालिकेत भाजपा-शिंदे सेनेचा मोठा विजय झाला. मात्र, मुंबईत ठाकरे बंधूंना अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईत महापालिकेत मनसेला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. यावरूनच संतोष धुरी यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेची चेष्टा झाली अशी खोचक टीका संतोष धुरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

संतोष धुरी काय म्हणाले?

“तुम्ही ठाकरे सेनेबरोबर जागावाटप केलं, त्या जागावाटपात घोळ झाला आणि त्याचा हा परिणाम आहे. आज तुम्ही (राज ठाकरे) शिवसेना ठाकरे आणि मनसे युतीत आल्यानंतर ज्या ठाकरे सेनेच्या जागा आधी फक्त ३५ ते ४० निवडून आल्या असत्या, त्या जागा युतीमुळे ६० पेक्षा जास्त जागा निवडून आल्या. पण तुम्ही (मनसे) कुठे अडकलात? म्हणजे तुमचा वापर करण्यात आला, तुमच्या अजूनही हे लक्षातच येत नाही. अजून किती वर्ष तुम्ही असंच दुसऱ्यांना जिंकवणार आहात? तुम्ही अजूनही दुसऱ्यांनाच जिंकवत राहणार आहात का?”, असा सवाल संतोष धुरी यांनी केला आहे.

“एका लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला होता. त्याचा भाजपाला फायदा झाला होता, तसेच ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत काँग्रेसला पाठिंबा दिला होता, तेव्हा काँग्रेससह महाविकास आघाडीला मनसेचा मोठा फायदा झाला. त्यानंतर आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती केली. ठाकरे सेनेबरोबर युती केल्यानंतर युतीचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला, म्हणजे फक्त दुसऱ्यांना जिंकवायचं? पण स्वतःच्या पक्षाच्या फक्त ६ निवडून आल्या. युतीमुळे मनसेच्या जागा वाढल्या नाहीत, म्हणजे तुमचा फायदा झाला का?”, अशी टीका संतोष धुरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

मुंबई महापालिकेत मनसेचा किती जागांवर विजय झाला?

मुंबईत महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. राज्यातील २९ महापालिकांपैकी फक्त चार महापालिकांमध्ये मनसेचे १३ नगरसेवक आले आहेत. एक काळ असाही होता की मनसेचे राज्यात १३ आमदार निवडून आले होते. आताचा काळ असा आहे की पक्षाला जी उतरती कळा लागली आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा आलेख खालावतो आहे.

मनसेचे नगरसेवक कुठे-कुठे आहेत?

मुंबई -मनसे- ६ जागा
नवी मुंबई- १ जागा
कल्याण डोंबिवली-५ जागा
नाशिक- १