पुण्यात बेदरकारपणे एसटी बस चालवून नऊ जणांचा बळी घेतल्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीला संतोष माने याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र त्याचे वकील काही ना काही सबब पुढे करून सुनावणीला गैरहजर राहत असल्याने अपिलावरील सुनावणीची तारीख निश्चित होत नव्हती. न्यायालयाकडून चपराक मिळाल्यावर त्याचे वकील सोमवारी हजर झाले आणि मानेच्या अपिलावरील सुनावणीची तारीख निश्चित झाली. त्यामुळे २५ जूनपासून दररोज अपिलावर सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर माने याच्या अपिलावर सुनावणी होणार आहे. आपली मानसिक स्थिती नीट नसून आपल्यावर त्या अनुषंगाने उपचार सुरू असल्याचा दावा करीत माने याने फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. मात्र मानेचे वकील सतत गैरहजर असल्याची बाब अतिरिक्त सरकारी वकील माधवी म्हात्रे यांनी मागील सुनावणीच्या वेळेस निदर्शनास आणून दिल्यावर संतापलेल्या न्यायालयाने वकिलांच्या अशा बेजबाबदारपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपीला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली असून त्याने केलेल्या अपिलावरील सुनावणीसाठी सबबी सांगून वकील गैरहजर कसे राहू शकतात, असा सवाल करीत फाशीच्या शिक्षेविरोधात केलेल्या अपिलावरील सुनावणी गांभीर्याने न घेणाऱ्या वकिलांच्या वर्तवणुकीबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस मानेचे वकील हजर झाले आणि न्यायालयाने अपिलावरील सुनावणीची तारीख निश्चित केली.