मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि वसई-विरारसह महामुंबईतील अनेक भागात संध्याकाळी रस्त्यांवरून जाताना किंवा पदपथावरून चालताना एक उग्र सुवास सगळ्यांचे लक्ष घेतो. साधारपणे ऑक्टोबरच्या अखेरीस हा सुवास हवेत दूरवर पसरू लागतो आणि हिवाळ्यासह दिवाळ सणाची वर्दीच जणू निसर्ग या झाडाच्या माध्यमातून देतो. मात्र, मागील काही वर्षांपासून या झाडांनी नागरिकांची डोकेदुखी वाढवली असून मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील काही भागात या झाडांची लागवड पूर्णपणे थांबवली असून या झाडावर बंदी घातली आहे.

दिवाळीची वर्दी देणारे झाड

भारतात ऋतूनुसार फुलणारी अनेक फुलझाडे आहेत. पावसाची वर्दी देणारे ‘बहावा’ हे झाड म्हणूनच ‘गोल्डन रेन ट्री’ किंवा ‘गोल्डन शॉवर ट्री’ या नावाने प्रसिद्ध आहे. हिवाळ्यासह दिवाळीची वर्दी देणारे झाड म्हणजे ‘सप्तपर्णी’ ! उंच वाढलेले, बाराही महिने हिरवेगार असणारे आणि ऑक्टोबरच्या अखेरीस छोट्या पांढऱ्या, चांदणीच्या आकाराच्या फुलांनी बहरून जाणारे हे झाड अनेकांना परिचित असते ते त्याच्या अतिउग्र अशा गंधामुळे. या झाडाच्या एका फांदीला किंवा देठाला चक्राकार पद्धतीने सात पानांचा समूह एकत्र जोडलेला असतो, म्हणून याला ‘सप्तपर्णी’ (सात पानांची) असे म्हणतात. ‘सप्तपर्णी’ चे शास्त्रीय नाव ‘ॲल्स्टॉनिया स्कॉलरिस’ असे असून पूर्वी या झाडांच्या लाकडाचा वापर करून लहान मुलांसाठी पाट्या तयार केल्या जात असत. म्हणून या झाडाच्या नावात स्कॉलरशी संबंधित शब्द आहे. तसेच या झाडाला ‘डेव्हिल्स ट्री’ किंवा डिटाबार्क असेही म्हणतात.

महानगरांमध्ये या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात का ?

काही संशोधन अभ्यासानुसार, सप्तपर्णीच्या झाडांमध्ये ‘एअर पोल्युशन टॉलरन्स इंडेक्स’ म्हणजेच प्रदूषण सहन करण्याची ताकद अधिक असते. सप्तपर्णीच्या या वैशिष्ट्यामुळे प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या संस्थांकडूनही शहरात हरित पट्टे निर्माण करण्याच्या उद्देशाने या झाडांच्या लागवडीची शिफारस केली गेली. त्यामुळे केवळ महामुंबईतच नाही तर दिल्लीसह अनेक शहरांमध्ये या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली.

शहरांची डोकेदुखी का वाढवली ?

ही झाडे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुलली की काहीच दिवसात दिवाळी येते. मात्र, या फुलांचा गंध इतका उग्र असतो की जास्त वेळ तुम्ही या झाडांच्या परिसरात असल्यास तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवण्याची शक्यता असते. तसेच ॲलर्जी, अस्थमा आणि सायनसचा त्रास असलेल्या नागरिकांना श्वसनाचा त्रास किंवा डोकेदुखी होऊ लागते. म्हणून सध्या शहरांमध्ये किंवा निवासी संकुलाशेजारी ही झाडे लावणे टाळले जाते. मुंबई महानगरपालिकेने देखील या झाडाची लागवड पूर्णपणे थांबवली आहे. आयुर्वेदात सप्तपर्णीचा वापर केला जात असला तरीही या झाडाचे काही भाग विषारी मानले जातात.