‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’तील आवाहनाला दातृत्वाची दाद मुंबई : कैद्यांच्या पुनर्वसनाचे ध्येय उराशी बाळगून शिक्षेनंतरचे त्यांचे आयुष्य स्वावलंबी आणि समृद्ध करण्यासाठी झटणाऱ्या दादर येथील ‘रामचंद्र प्रतिष्ठान’ या संस्थेला पुनवर्सन केंद्र उभारण्यासाठी औरंगाबाद येथील भोसले दाम्पत्याने १५ एकर जागा उपलब्ध करून दिली. ‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून या संस्थेच्या कार्याची ओळख करून देण्यात आली होती. गणेशोत्सवात परंपरेसोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या, समाजासाठी अहोरात्र काम करणाऱ्या संस्थांना मदतीचा हात देणारा ‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम गेली अकरा वर्षे सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी निवडक संस्थांच्या कार्याची गणेशोत्सवाच्या काळात ओळख करून दिली जाते. या संस्थांना मदतीचा हात मिळवा यासाठी वाचकांना आवाहन करून ‘दानयज्ञ’ उभा केला जातो. या माध्यमातून संस्थांना आर्थिक पाठबळ मिळतेच, शिवाय कायमस्वरूपी मदत करणारे हातही संस्थेशी जोडले जातात. यंदा या उपक्रमाच्या माध्यमातून ओळख करून देण्यात आलेल्या दादर येथील ‘रामचंद्र प्रतिष्ठान’ या संस्थेला १५ एकर जमीन वापरासाठी देण्यात आली आहे. ‘या जागेवर मुलभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत. जागेपर्यंत जाण्यासाठी पक्के रस्ते, वीज, पाणी, निवास, देखभाल, वाहन व्यवस्था, कृषी अवजारे, सामग्री, बि-बियाणे, खत आणि इतर अनेक गोष्टींची पूर्तता होणे बाकी आहे. हे पुनर्वसन केंद्र उभे करून कैद्यांना शिक्षा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे,’ असे शिंदे यांनी सांगितले. कारागृह मुख्यालय, पुणे येथील प्रशासनाला पत्र लिहून या उपक्रमाची माहिती दिली असून जे बंदिवान मुक्त झाले आहेत किंवा मुक्त होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना या पुनर्वसन केंद्रात येण्याबाबत माहिती देण्याचेही आवाहन केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पुनर्वसन केंद्रात काय असेल? कारागृहातून मुक्त झालेल्या बंदिवानांसाठी रोजगार व स्वयंरोजगार यांचे मार्ग उपलब्ध होतील. शेती, शेतीशी पूरक उद्योग, कुक्कुटपालन, पशूपालन, रोपवाटिका, फुल शेती, फळ शेती, मशरुम, औषधी वनस्पतींची लागवड, कृषी पर्यटन, मधमाशापालन, रेशीम उद्योग, हळद, बांबू उद्योग, ज्वारी प्रक्रिया, डाळ प्रक्रिया, फळ-भाजी प्रक्रिया, द्रोण व पत्रावळी तयार करणे, दुग्धजन्य उत्पादने तयार करणे, पशुचारा कुक्कुटखाद्य उत्पादन, कुटिरोद्योग, मस्त्यपालन अशा स्वरुपाचे कृषीविषयक उपक्रम इथे सुरु करण्यात येतील. तसेच कैद्यांच्या निवासाची सोय केंद्रात केली जाणार आहे. अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम.. कारागृहातून शिक्षा भोगून आलेल्या व्यक्तीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत नाही. घडलेल्या गुन्ह्यांबाबत कैद्यांच्या मनात सल असते. समाजाकडून झिडकारले जाण्याने ते अधिक नैराश्यात जातात. अशा कैद्यांचे समुपदेशन करून त्यांना पाठिंबा देऊन स्वावलंबी बनवण्याची नितांत गरज आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे काम होत आहे. परंतु अशा पद्धतीचे पुनर्वसन केंद्र अद्याप उभे राहिलेले नाही. ‘रामचंद्र प्रतिष्ठान’ कडून उभारले जाणारे हे राज्यातील पहिले पुनर्वसन केंद्र असेल. होणार काय? * औरंगाबाद येथे राहणारे भानुदास भोसले व कोकीळा भोसले यांनी संस्थेला जागा देऊ केली. औरंगाबाद शहरालगतच्या कोलठाण गावात ही जमीन आहे. * येथे कृषी केंद्राच्या माध्यमातून कैद्यांसाठी पुनर्वसन प्रकल्प राबवण्याची संकल्पना भोसले कुटुंबीयांनी मांडली. * संस्थेचे अशोक शिंदे आणि संचालिका नयना शिंदे यांनी जागेची पाहणी करून हा प्रस्ताव मंजूर केला. * जागेची मालकी भोसले कुटुंबीयांकडेच असणार आहे. परंतु तिथे संस्था मुक्तपणे पुनर्वसनाचे काम करू शकते. ‘लोकसत्ता’ने आमच्या कार्याची ओळख करून दिली ते आमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अत्यंत परिणामकारक ठरले. पुनर्वसन केंद्राच्या निर्मितीसाठी आम्ही गेली अनेक वर्षे धडपडत होतो त्याचे फलित ‘लोकसत्ता’च्या एका लेखामुळे मिळाले. या प्रकल्पामुळे कैदी सुटका झाल्यानंतर स्वत:च्या पायावर स्वावलंबी जीवन जगू शकतील तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील. हे कार्य आव्हानात्मक असून त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी समाजातील विविध घटकाचा यात सक्रिय सहभाग आवश्यक आहे. -अशोक शिंदे, रामचंद्र प्रतिष्ठान ‘लोकसत्ता’ मध्ये आलेल्या लेखातून संस्थेचे कार्य आमच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर आम्ही तातडीने संस्थेशी संपर्क साधला. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी विधायक काम होणे गरजेचे आहे. मी स्वत: वकिलीचे शिक्षण घेतले असल्याने कैद्यांचे आयुष्य जवळून पाहिले आहे. त्यामुळे कैद्यांना शिक्षेनंतर मुख्य प्रवाहात आणणे महत्वाचे आहे. ‘रामचंद्र प्रतिष्ठान’चे ध्येय असलेले पुनर्वसन केंद्र ही काळाची गरज आहे. त्यासाठी आम्ही १५ एकर जमीन संस्थेला वापरासाठी दिली असून येथे रावबल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्येही आम्ही सक्रिय सहभागी होणार आहोत. -डॉ. ललिता नितीन भोसले (भानुदास यांच्या स्नुषा)