मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत आत्मनिर्भर व्हावे यासाठी मुंबईतील ‘टच- टर्निंग ऑपॉच्र्युनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाइल्ड हेल्प’ ही संस्था गेली तीन दशकांहून अधिक काळ अखंडपणे कार्य करत आहे. संस्थेचे कार्य महाराष्ट्रापुरते सीमित न राहता इतरही काही राज्यांत कार्याचा विस्तार करण्यात आला आहे.

टच संस्थेची सुरुवात झाली तेव्हा केवळ गरजू, वंचित गटातील विद्यार्थ्यांचा विकास हा एकमेव उद्देश संस्थेसमोर होता. अगदी मोजक्या विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही संस्था आज हजारो विद्यार्थ्यांचे आश्रयस्थान बनली आहे. यात ज्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होता येत नाही अशा मुंबईतील पदपथावर, सिग्नलवर आपल्या कुटुंबासाठीच्या उदरनिर्वाहासाठी साहाय्य करणार्‍या मुलांपासून ते क्षेपणभूमीवरील कचरावेचक मुलांचा समावेश आहे. यांसह संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी होणारे ९० टक्के विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत.

सध्या या संस्थेशी जोडलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या सहा हजार आहे. शैक्षणिक दत्तक पालकत्व, पुस्तक पेढी, ब्रिज स्कूल, बालग्राम यांसह अनेक उपक्रम संस्थेकडून राबविले जातात. करोनाकाळातही संस्थेने कर्ज घेत आपले कार्य सुरू ठेवले. मुलांना वाचनाची गोडी लागावी, वाचनाचे संस्कार व्हावे यासाठी संस्थेने वीणा गवाणकर लिखित ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाच्या हजारो प्रती विद्यार्थ्यांना भेट दिल्या. उद्याचे जागरूक नागरिक घडविण्यासाठी संस्था सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. संस्थेशी जोडलेले विद्यार्थी आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात असणारे विद्यार्थी एकाच व्यासपीठावर यावे, त्यांच्यात संवाद व्हावा या उद्देशाने संस्थेकडून विविध उपक्रम राबविले जातात.

सध्या संस्थेच्या मालकीचा एक निवासी प्रकल्प कार्यरत आहे. यातून वंचित घटकातील मात्र शिक्षणाची आस असणारे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी करणे हाच संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आज संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपल्या पायावर उभे राहत आहेत. उच्च शिक्षणाची नव्या संधी उपलब्ध होत असतात.

संस्थेतील उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहणार्‍या विद्यार्थ्यांना बळ देण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याकडेही संस्था लक्ष पुरवते. आतापर्यंत १ हजार ९५४ विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास संस्था यशस्वी झाली आहे. विविध प्रकल्प सुरू ठेवणे, वाढती विद्यार्थ्यांची संख्या आणि मोठ्या निधीची आवश्यकता अशी अनेक आव्हाने संस्थेसमोर आहेत आणि त्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.