मुंबई : राज्यातील माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी सातारा आणि पंढरपूर येथे सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण असे अद्ययावत संकुल उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात दोन लाखापेक्षा जास्त माजी सैनिक आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या जागांचा संयुक्त विकास करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे माजी सैनिकांच्या प्रश्नाबाबत एक बैठक पार पडली.

सातारा येथे उभारण्यात येणाऱ्या संकुलामध्ये वीरपत्नी आणि माजी सैनिकांच्या पत्नींनी स्थापन केलेल्या बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. पंढरपूर येथे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी निवास व्यवस्था, प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रशासकीय सेवा आणि अन्य आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आधुनिक संकुल उभारले जाणार आहे.

पर्यटन विकासासोबतच माजी सैनिकांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. हा प्रकल्प राज्यातील माजी सैनिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी नवा आदर्श निर्माण करणारा ठरेल. राज्यातील माजी सैनिक, वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एकाच ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देणारा हा राज्यातील पहिलाच एकात्मिक विकास प्रकल्प आहे. असे देसाई यांनी स्पष्ट केले. बैठकीला पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, माजी सैनिक कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव संतोष कुमार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, उपस्थित होते.