राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून सतीश माथूर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सध्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा कार्यकाळ उद्या संपुष्टात येत आहे. त्यांनी या पदावरील मुदतवाढीसाठी कोणतीही विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली नव्हती. सबळ कारणाअभावी सरकारही त्यांना मुदतवाढ देण्यास अनुकूल नव्हते. त्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार सतीश माथूर यांची महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सतीश माथूर हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक आहेत. १९८१च्या आयपीएस तुकडीतील सतीश माथूर यांनी याआधी विधि व तांत्रिक तसेच पोलीस गृहनिर्माण व कल्याण विभागाचे महासंचालक म्हणून काम पाहिले आहे. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना त्यांनी एअर इंडिया, सीबीआयमध्येही काम केले आहे. त्यांनी पुण्याचे आयुक्तपदही भूषविले आहे.
दरम्यान, माथूर यांच्यानंतर रिक्त होणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदाची सूत्रे कोणाकडे जाणार हा कळीचा मुद्दा ठरेल. मुख्यमंत्र्यांनी शीना बोरा हत्या प्रकरणात मारिया यांची पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली होती. त्यानंतर जावेद अहमद यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करून व विजय कांबळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती करण्यात आली होती.
मारियांना ‘एसीबी’च्या महासंचालकपदाची महत्त्वाकांक्षा भोवली
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुरा सेवाज्येष्ठतेनुसार महासंचालक राकेश मारिया यांच्याकडे सोपवावी लागणार असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध बिघडल्याने ते सेवानिवृत्त होईपर्यंत म्हणजे २०१७ पर्यंत या पदाचा कार्यभार अतिरिक्त महासंचालक विवेक फणसळकर यांच्याकडे सोपविण्याचा विचार गृह विभागात सुरू असल्याचे वृत्त आहे.  मात्र, मारिया यांना डावलून या पदाचा कार्यभार प्रभात रंजन यांच्याकडे दिल्यास त्याचे कोणते पडसाद उमटतील, याचीही चाचपणी सध्या सुरू आहे.