मुंबई : स्वातंत्र्यावीर विनायक दामोदर सावरकर यांचे दादरस्थित निवासस्थान `सावरकर सदन’ हे वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यास पात्र आहे. त्याचे पाडकाम रोखण्याच्या आणि त्याचे जतन करण्याच्या दृष्टीने तशी शिफारसही करण्यात आली असल्याची भूमिका भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात मांडली.

ही इमारत राज्य संरक्षित स्मारक किंवा महापालिका वारसास्थळांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठीही पात्र असल्याचे एएसआयने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. सावरकर सदनला वारसा स्थळाचा दर्जा देण्याच्या यापूर्वीच करण्यात आलेल्या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी अभिनव भारत काँग्रेसचे पंकज फडणीस यांनी जनहित याचिका केली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायालयाच्या आदेशानुसार एएसआयतर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.

एएसआयच्या १९५८ च्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायद्यांतर्गत एखादी वास्तू राष्ट्रीय स्मारक किंवा स्थळ संरक्षित घोषित केल्यानंतरच त्याचे जतन होऊ शकते. त्यासाठी संबंधित वास्तू १०० वर्षांपेक्षा पुरातन असणे आवश्यक आहे. सावरकर सदन गजबजलेल्या शहरी भागात असून अद्याप केंद्र सरकारने या वास्तूला संरक्षित स्मारक घोषित केलेले नाही. परंतु, या इमारतीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्याला वारसा संरक्षण मिळणे आवश्यक असून राज्य किंवा महानगरपालिकेने त्याचे संरक्षण केले पाहिजे, असे एएसआयने प्रतिज्ञापत्रात अधोरेखीत केले आहे.

सावरकर सदनचे १९३८ मध्ये बांधकाम करण्यात आले. या दोन मजली इमारतीत सावरकर हे १९६६ म्हणजे मृत्यूपर्यंत वास्तव्यास होते. हे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ असून, तिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांसह बैठका पार पडल्या आहेत. सावरकरांच्या निधनानंतर, १९८४ मध्ये अतिरिक्त मजले बांधले गेले. त्यामुळे या इमारतीचे आठ सदनिका असलेल्या बहुमजली इमारतीत रूपांतर झाले. सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या मालकीची तळमजल्यावर फक्त एकच खोली असून तिथे छोटेखानी संग्रहालय आहे. पूर्वी या सदनिकेमधील दोन खोल्या सावरकर कार्यालय म्हणून वापरत असत, तिथे सावरकरांशी संबंधित स्मृतीचिन्हे ठेवली आहेत. सावरकरांची सून सुनंदा विश्वास सावरकर (९२) या अजूनही या इमारतीत वास्तव्यास आहेत, असे देखील प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.