मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या लेन्सद्वारेही रुग्णालयांकडून लूट!

एफडीएचा औषध प्राधिकरणाला अहवाल

बलून आणि गाईिडग कॅथेटर तसेच इतर सामग्रीही अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत आणण्याबाबत प्राधिकरणाला पत्र पाठविण्यात आले आहे.

एफडीएचा औषध प्राधिकरणाला अहवाल

अन्जिओप्लास्टिसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेन्ट, बलून तसेच गाईडिंग कॅथेटर आणि तत्सम सामग्रीच्या माध्यमातून सुरू असलेली लूट राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उघड केली असतानाच आता मोतीबिंदू वा तत्सम शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध कंपनींच्या लेन्सद्वारेही इस्पितळांकडून मोठय़ा प्रमाणात रुग्णांची लूट सुरू असल्याची बाब बाहेर आली आहे. या प्रकरणी एफडीएने विविध इस्तितळांची तपासणी करून अहवाल तयार केला असून तो राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाला पाठविला आहे. लेन्सची वर्गवारी अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत समावेश करावा, अशी मागणी एफडीएने केली आहे.

कोरोनरी स्टेंटच्या किमतींवर मर्यादा आणण्यात प्रशासन यशस्वी ठरले होते. त्यानंतर बलून आणि गाईडिंग कॅथेटर तसेच तत्सम सामग्रीद्वारेही इस्पितळांकडून मोठय़ा प्रमाणात लूट सुरू असल्याची बाब प्रशासनाच्या गुप्तचर विभागाने केलेल्या तपासात स्पष्ट झाले होते. मूळ किंमतीच्या तब्बल ५५० टक्क्य़ांपर्यंत शुल्क आकारले जात होते तसेच कॅथेटरचा दोन ते सात वेळा पुनर्वापर होत असल्याचेही निदर्शनास आले होते.

बलून आणि गाईिडग कॅथेटर तसेच इतर सामग्रीही अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत आणण्याबाबत प्राधिकरणाला पत्र पाठविण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे मावळते आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मोतीबिंदू शस्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या लेन्सच्या दरपत्रकाचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध सरकारी तसेच खासगी इस्पितळात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध कंपन्यांच्या लेन्सच्या विक्री किंमत आणि रुग्णांकडून आकारले जाणारे शुल्क यांचा आढावा घेतला असता धक्कादायक बाब समोर आली. काही लेन्सेससाठी २० पट जादा किंमत आकारण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर कुठल्या कंपनीची लेन्स वापरण्यात आली याबाबत तपशील दिलेला असतो. इतकेच नव्हे तर संबंधित लेन्सच्या कमाल किरकोळ किंमतीचा उल्लेख असलेले लेबलही लावले जाते. कमाल किरकोळ किंमतीपेक्षा कमी किमत आकारण्यात आल्याचा दावा इस्पितळाकडून केला जातो. परंतु या लेन्सेसची विक्री किंमतच मुळात कमी असते, याकडेही डॉ. कांबळे यांनी लक्ष वेधले. या लेन्सच्या माध्यमातून उत्पादक, वितरक आणि पर्यायाने इस्पितळांकडून होत असलेली लूट आटोक्यात यावी, असा आमचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विविध प्रकारच्या लेन्सेसची विक्री किंमत रुपयांत

(कंसात कमाल किरकोळ किंमत) : सिंगल पीस अल्कॉन – ४५०२ (७२००); अल्कॉन आयक्यू – ५६८७ (९५७५); अल्कॉन टोरिक – १५,२०० (२६,५५०); अक्रॉईल ईसी – २५०० (१२,७००); ओक्यूफ्लेक्स – ३५०(५८००); अल्टिमा – ८०० (८०००); अल्टिमा प्लस नॅचरल – १५०० (९५००)

कॉरोनरी स्टेन्टप्रमाणेच इन्ट्राओक्युलर लेन्सेस या डोळ्यांशी संबंधित शस्त्रक्रियेत महत्त्वाच्या आहेत. परंतु प्रत्यक्षात उत्पादकाकडून अल्प किमतीत लेन्सेस उपलब्ध असतानाही रुग्णांकडून २० पट शुल्क उकळणे अन्यायकारक आहे. यावर कुठेतरी नियंत्रण यायला हवे. त्यामुळे या लेन्सेसचा अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत समावेश व्हावा, यासाठी किंमत निश्चित करणाऱ्या प्राधिकरणाला अहवाल पाठविण्यात आला आहे  – डॉ. हर्षदीप कांबळे, माजी आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Scam in cataract surgery