मुंबई : दप्तराच्या वाढत्या वजनाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी दप्तराचे वजन हे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे स्पष्ट निर्देश शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. वाढत्या दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने ‘शालेय दप्तर धोरणा’च्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये दप्तराचे वजन, शालेय साहित्याचे नियोजन आणि विद्यार्थ्यांवरील अनावश्यक शैक्षणिक ओझे कमी करण्यावर भर दिला आहे.
विद्यार्थ्यांना दररोज पाठ्यपुस्तके, वह्या, सरावाच्या वह्या, कार्यपुस्तिका आणि अन्य शैक्षणिक साहित्य शाळेत न्यावे लागते. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दप्तर हे ओझे ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर पडणारा शारीरिक ताण कमी करण्यासाठी शालेय विभागाने ‘शालेय दप्तर धोरण’ जाहीर केले.
विद्यार्थ्यांचे वय आणि शारीरिक क्षमतेचा विचार करून दप्तराचे ओझे नियंत्रित ठेवण्याचा या धोरणाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक शैक्षणिक साहित्यच शाळेत आणावे यासाठी शाळा प्रशासनाने नियोजन करावे, दप्तराचे वजन अनावश्यकपणे वाढणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर सोपविण्यात आली आहे. दप्तराचे वजन निर्धारित १० टक्क्यांच्या मर्यादेत आहे की नाही, याची नियमित तपासणी करावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. यासाठी शाळांनी वेळापत्रक आणि अध्यापन पद्धतीचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यामुळे दप्तरातील अनावश्यक साहित्य कमी होऊन विद्यार्थ्यांचे ओझे हलके होण्याची अपेक्षा आहे.
शिक्षक व पालकांमध्ये समन्वय आवश्यक
दप्तराचे वजन कमी करण्यासाठी केवळ शाळांनी नियोजन करणे पुरेसे नसून, पालकांनीही यामध्ये पुढाकार घेणे अपेक्षित आहे. शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक यांनीही समन्वयाने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
केंद्राच्या सूचनांचा आधार
केंद्राच्या शालेय शिक्षण विभागाने ११ ऑगस्ट रोजी दप्तराचे वजन कमी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. शाळांनी दप्तराच्या वजनावर नियमित लक्ष ठेवावे आणि जड दप्तरामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती करावी, असे सूचित केले होते. शैक्षणिक उपक्रमांचे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांवरील अनावश्यक ओझे कमी करण्यावरही त्यात भर देण्यात आला होता.
