लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्यााचार करून तिचे अश्लील छायाचित्र काढून धमकावणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीला कुरार पोलिसांनी अटक केली. आरोपी पीडित मुलीच्या शालेय बसचा चालक आहे. त्याच्याविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित १५ वर्षांची विद्यार्थिनी शालेय बसमधून शाळेत जात-येत होती. शालेय बसच्या चालकाने तिच्यासोबत मैत्री केली आणि एकदा संधी साधून तो तिला गोराई येथील लॉजवर घेऊन गेला. तेथे त्याने पीडित मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने पीडित मुलीची छायाचित्रे व ध्वनीचित्रफीत काढली. त्यानंतर याबाबत कोणालाही सांगितल्यास छायाचित्रे सर्वांना पाठवण्याची धमकी त्याने पीडित मुलीला दिली.
या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली. आरोपी गेल्यावर्षीपासून ११ मार्च, २०२५ पर्यंत पीडित मुलीला धमकावत होता. अखेर तिने धाडस दाखवून याप्रकरणी कुरार पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला गुरूवारी अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.