दहा वर्षांत २६ टक्क्यांनी भर; इतर वाहनांची संख्या सरासरी १० टक्के
राज्यातील वाहनांची वाढती संख्या आणि अपघातांचे प्रमाण याबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच गेल्या दहा वर्षांमध्ये दुचाकी, चारचाकी किंवा अवजड वाहनांपेक्षा शाळा बसेसची नोंदणी सर्वाधिक म्हणजेच तब्बल २६ टक्क्यांनी वाढली आहे. रुग्णवाहिकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.
राज्यात आतापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या वाढीचे सरासरी प्रमाण जास्त होते, पण २००४ पासून गतवर्षी मार्चअखेपर्यंत वाहनांच्या संख्येवर नजर टाकल्यास शाळांच्या बसेसच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी शहरांमध्ये अनेक शाळांमध्ये बसेसची सेवा सुरू झाली. यापूर्वी रिक्षांमध्ये मुले कोंबली जात. रिक्षांच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याने शासकीय यंत्रणांनी मुले कोंबणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई सुरू केली. काही शाळांनी स्वत:च्या बसेस सुरू केल्या किंवा खासगी शाळा बसेसची संख्याही वाढली.
२००४ ते २०१५ (मार्चअखेर) या काळात राज्यात नोंदणी झालेल्या सर्व वाहनांमध्ये सर्वाधिक २६.५२ टक्के नोंदणी ही शाळा बसेसची झाली आहे. रिक्षा किंवा अन्य कोणत्याही वाहनांपेक्षा पालक वर्ग बसेसना प्राधान्य देतात. यामुळे बसेसची संख्या वाढल्याचे ‘मुंबई स्कूल बस असोसिएशन’चे अध्यक्ष अनिल गर्ग यांचे म्हणणे आहे. पालकही पाल्य बसेसमधून शाळांमध्ये ये-जा करीत असल्यास अधिक निर्धास्त असतात, असा दावाही त्यांनी केला. २०११-१२ ते २०१३-१४ या काळात शाळा बसेसची संख्या लक्षणीय वाढल्याचे परिवहन विभागाला आढळून आले आहे. शाळा बसेसच्या नावाखाली काही खासगी बसेसची नोंदणी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, पण शाळा बसेसना पिवळा रंग सक्तीचा करण्यात आल्याने शाळा बसेसच्या नावे वाहतूक करण्याचा खासगी वाहतूकदारांचा डाव यशस्वी होऊ शकला नाही, असे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पुणे आघाडीवर
परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, हजार लोकसंख्येमागे पुणे जिल्हय़ात सर्वाधिक ४३३ वाहने आहेत. मुंबई शहरात हे प्रमाण २२५, तर मुंबई उपनगरात हे प्रमाण १७४ आहे. उपराजधानी नागपूरमध्ये (३६१), ठाणे (२४२), औरंगाबाद (२४६), नाशिकमध्ये २३६ वाहने आहेत.

Untitled-27