मुंबई : ई-चलनविरोधात राज्यातील वाहतूकदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या निषेधार्थ ५ मार्च रोजी आझाद मैदान येथे आंदोलन केले जाणार असून काही तोडगा न निघाल्यास ६ मार्च रोजी बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात येईल. या बंदमध्ये शालेय बसचे मालकही सहभागी होणार आहेत. त्यामुळे ५ व ६ मार्च रोजी राज्यातील सर्व शाळांच्या शालेय बस बंद राहणार आहेत. सध्या विविध परीक्षा सुरू असल्याने ऐन परीक्षेच्या काळात शालेय बस बंद राहणार असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.

वाहतूक पोलिसांकडून बेकायदेशीररित्या वाहतुकदारांचे ई-चलन काढले जाते. बऱ्याचदा वाहनतळांवर उभ्या असलेल्या वाहनांनाही दंड आकारला जातो. नियमांचे पालन केले जात असतानाही वाहतूक पोलीस आकस बुद्धीने ई-चलन काढत असतात. अनेक ठिकाणी प्राथिकृत अधिकाऱ्यांऐवजी अन्य कर्मचारी ई -चलन काढतात. याबाबत सरकारच्या भेटी घेऊनही आश्वासनांशिवाय काहीच मिळत नसल्याने वाहतुकदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील वाहतुकदारांनी ५ मार्च रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही काही तोडगा निघाला नाही तर ६ मार्च रोजी बेमुदत बंद पुकारण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये राज्यातील शालेय बस मालक संघटनाही सहभागी होणार आहेत.

राज्यामध्ये जवळपास आठ हजारांपेक्षा अधिक शालेय बस आहेत. या सर्व बसचे मालक व चालक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे ५ व ६ मार्च रोजी विद्यार्थ्यांना शालेय बसशिवायच शाळेत जावे लागणार आहे. सध्या परीक्षेचा कालावधीत असल्याने शालेय बस मालक संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांना पायी किंवा अन्य खासगी वाहनाने शाळेत जावे लागेल. छोट्या शहरांमधील मुलांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. मुले शाळेत वेळेवर पोहोचावीत यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व पर्यायाने परीक्षेवर होण्याची शक्यता असल्याची माहिती शालेय बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.

येत्या ५ मार्च रोजी राज्यभरातून एक लाखांहून अधिक वाहने मुंबईतील आझाद मैदानावर धडकतील. सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही, तर त्याच दिवसाच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत बंद केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ऍक्शन कमिटीने दिला आहे. ई-चलन आणि जाचक नियमांचा त्रास रिक्षा, टॅक्सी, बस आणि वैयक्तिक कार चालवणाऱ्या प्रत्येकाला होत आहे. त्यामुळे हे एक जनआंदोलन असून सर्व जनतेने यात सामील व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.