मुंबई: तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यांना नशेच्या दुष्टचक्रात ढकलणाऱ्या प्रवृत्तींना सुरुवातीलाच प्रतिबंध करणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय परिसर टपरी मुक्त झाला पाहिजे. शालेय अभ्यासक्रमातून अंमली पदार्थांचे दुष्परिणामांच्या ‘धडा’ समावेश करा, असे निर्देश निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ‘नशामुक्त महाराष्ट्र धोरणा’चे सादरीकरण करण्यात आले. नशामुक्त महाराष्ट्रासाठी शासकीय यंत्रणेचा समन्वित दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडल्यास राज्याला नशामुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. नशेच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढण्यासाठी राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशामुक्ती केंद्र स्थापन करण्यात यावा. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतही नशामुक्ती केंद्रे कार्यान्वित करावीत. केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या केंद्रांचे सक्षमीकरण करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. नशामुक्तीनंतर तरुण पुन्हा व्यसनाकडे वळू नयेत, यासाठी केवळ पुनर्वसन केंद्रे उभारून चालणार नाही. व्यसनाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवरही नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यासाठी या केंद्रांच्या कामकाजासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाचा परिसर टपरीमुक्त असावा. याबाबत कोणतीही तडजोड करू नये. सर्व शैक्षणिक संस्थांचे परिसर अमली पदार्थमुक्त करण्यासाठी प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी त्याबाबतची घोषणा करावी. शालेय अभ्यासक्रमात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत प्रभावी माहितीचा समावेश करण्याची कार्यवाही सुरु करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
राज्यात अमली पदार्थविरोधी कारवाईला वेग आल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. २०२३ मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत ८९७ कोटी रुपये किमतीचे ४३ हजार ६३२ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. २०२५ मध्ये जप्तीचे प्रमाण ५६ हजार २०६ किलोवर पोहोचले आहे. त्याची किंमत सुमारे एक हजार ३४० कोटी रुपये आहे. २०२३च्या तुलनेत जप्तीच्या प्रमाणात २९ टक्के, तर किमतीच्या दृष्टीने ४९ टक्के वाढ झाली आहे.
बैठकीला गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह उपस्थित होते.
