शाळा आजपासून; नियमांबाबत संभ्रम; शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात भरणारे ऑनलाइन वर्ग सोमवारपासून अनेक जिल्ह्यांत प्रत्यक्ष भरणार आहेत.

शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या धोरणांमध्ये विसंगती

मुंबई : मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळा सोमवारपासून  पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र, नियमांबाबत विसंगती असून, शाळाही संभ्रमात आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांला करोनाची लागण झाल्यास केवळ शेजारच्या मुलांचे विलगीकरण करावे, असे शिक्षण विभागाच्या शासन निर्णयातील नियमावलीत नमूद असताना करोनाबाधित आढळल्यास संपूर्ण वर्ग बंद करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी केली़

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात भरणारे ऑनलाइन वर्ग सोमवारपासून अनेक जिल्ह्यांत प्रत्यक्ष भरणार आहेत. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची संमती मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने गुरुवारी त्याबाबत नियमावली जाहीर केली. शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक यांनी काय काळजी घ्यावी याबाबत त्यात सूचना देण्यात आल्या. मात्र, शासन निर्णयातील सूचना आणि आरोग्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य यांमुळे शाळा व्यवस्थापन संभ्रमात आहे. शाळा सुरू होत असल्याने मुलांनी व पालकांनी नियमांचे पालन करावे, घाबरण्याचे कारण नाही. एखादा विद्यार्थी करोनाबाधित झाल्यास संपूर्ण वर्ग बंद करण्याची सूचना आरोग्य विभागाने शिक्षण विभागाला पाठवली आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना सांगितले. या उलट विद्यार्थी करोनाबाधित असल्यास त्याच्या मागील, पुढील आणि शेजारील तीन रांगांतील विद्यार्थ्यांना बाधीत विद्यार्थ्यांच्या निकट सहवासीत मानण्यात येईल, असे शिक्षण विभागाच्या नियमावलीत नमूद करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी करोनाबाधित झाल्यास नेमके काय करावे, याबाबत सरकारच्या दोन विभागांच्या धोरणात विसंगती असल्याचे समोर आले आहे.

‘प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक नाही’

 सोमवारपासून शाळा सुरू होत असल्या तरी मुलांनी शाळेत येणे बंधनकारक नाही. मुलांनी व पालकांनी मिळून त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या नियमावलीनुसार शाळेत जाण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. विद्यार्थी किंवा त्याच्या घरातील कुणी आजारी असल्यास विद्यार्थ्यांला शाळेत पाठवण्यात येऊ नये, अशीही सूचना करण्यात आली आहे.

शाळा कुठे सुरू?

’शाळा सुरू करण्यास शासनाने संमती दिली असली तरी स्थानिक प्रशासनाला त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार मुंबई, ठाणे, नाशिक, लातूर, वर्धा, नांदेड येथील पहिलीपासूनचे सर्व वर्ग सोमवारपासून भरणार आहेत.

’पुण्यातील शाळांबाबत पुढील आठवडय़ात निर्णय घेण्यात येणार आहे. जळगाव येथील ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार आहेत, तर औरंगाबाद येथे फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग भरणार आहेत.

’नागपूर, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नगर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. पालघर, धुळे येथील आठवी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत. कोल्हापूर येथील शाळा मंगळवारपासून सुरु होणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: School from today discrepancies in the policies of the department of education and health health minister rajesh tope online class akp

Next Story
मध्य वैतरणा धरणावर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती; पालिका स्तरावर देशातील पहिला उपक्रम : १०० मेगावॉटची क्षमता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी