मुंबई : नवे शैक्षणिक वर्ष सुरु होताना शालेय साहित्याच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. त्याचा थेट फटका पालक आणि विद्यार्थ्यांना बसताना दिसत असून यामुळे पालकांवरील खर्चाचा भार वाढला आहे. अभ्यासक्रम पूरक पुस्तके, सराव संच, व्यवसाय, वह्या, दप्तर, चित्रकलेचे साहित्य या सगळ्याच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सध्या देशात इंधनाच्या किंमतीत वाढ होत असतानाच आता वाढत्या महागाईची झळ शालेय साहित्यालाही बसल्याचे दिसत आहे. गणवेश, दप्तर, डबे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्या यांच्या किंमतीतही १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. इंधन दर वाढीमुळे वाहतुकीसाठी होणारा खर्च वाढल्याने त्याचाही परिणाम शालेय साहित्याच्या किंमतीवर झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. तसेच वह्या पुस्तके यासाठी लागणाऱ्या कागदाच्या निर्मिती खर्चात वाढ झाली असल्याने पुस्तकांच्या किंमतीत वाढ झाली आहे असेही विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

सध्या सुट्ट्यांचा हंगाम हळूहळू संपत आला असून पुढील पंधरा ते वीस दिवसांत शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शालेय साहित्याच्या खरेदीसाठी दुकांनामध्ये गर्दी होऊ लागली आहे. दादरसह शहरातील इतरही प्रमुख बाजारपेठांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांनी शालोपयोगी साहित्याच्या खरेदीत गुंतलेले दिसत आहेत. शालेय पुस्तकांच्या किंमतीत गेल्यावर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे दादर येथील एका पुस्तक विक्रेत्याने सांगितले. दरवाढ झाल्याने आवश्यक तेवढ्या वह्या आणि शालेय साहित्य खरेदी करण्यास पालक प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र, रेनकोट, छत्री तसेच गणवेश आणि पाठ्यपुस्तके अशा साहित्याच्या खरेदीसाठी पालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. यामुळे इंधनासह वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या पालकांना आर्थिक गणिताची जुळवाजुळव करताना तारेवरची कसरत करावी लागते आहे.

पहिली ते तिसरीच्या पाठ्यपुस्तकांची प्रतिक्षाच

पहिली ते तिसरी इयत्तेची पाठ्यपुस्तके अजूनही बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. यामुळे काही पालकांना पुस्तक खरेदी न करताच माघारी फिरावे लागत आहे. अभ्यासक्रम बदलल्याने अजून पुस्तके बाजारात उपलब्ध झाली नाहीत. साधारणपणे पुढील आठ ते दहा दिवसांनी पहिली ते तिसरी इयत्तेची पाठ्यपुस्तके बाजारात दाखल होतील, असे पुस्तक विक्रेत्याने सांगितले. यामुळे प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसाठी आणखीन काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.