मुंबई : राज्यामध्ये इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन केले जाते. त्यानुसार शाळांचे वार्षिक परीक्षेचे वेळापत्रकही ठरवले जाते. गतवर्षी ही परीक्षा विलंबाने म्हणजे १५ एप्रिलपासून घेण्यात आली. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांसाठी भरविण्यात येणाऱ्या छंदवर्गावर झाला. तसेच मराठवाडा व विदर्भातील शाळांमधील विद्यार्थ्यांना उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदा पॅट परीक्षा २ ते १५ एप्रिल या कालावधीत घेण्यात यावी, तसेच परीक्षेचे वेळापत्रक तातडीने जाहीर करावे, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेकडून करण्यात आली आहे.

दरवर्षी शालेय स्तरावरील वार्षिक परीक्षा साधारणतः १० ते १२ एप्रिलदरम्यान संपतात. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणी, गुणनोंद, निकालपत्रे तयार करणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर वर्ग, चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य असे विविध कौशल्य पूरक उपक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. तसेच एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी आणि किमान पाच विषयांचा कार्यभार गृहित धरला तर एका शिक्षकाला ३५० ते ४०० उत्तरपत्रिका तपासाव्या लागतात. या सर्व प्रक्रियेसाठी किमान १० ते १२ दिवसांची गरज भासते.

उत्तरपत्रिका तपासून झाल्यानंतर त्यांचे अन्य शिक्षकांकडून नियमन करणे, त्यानंतर गुणयाद्या तयार करून वर्गशिक्षकांकडे दिल्या जातात. त्यावर निकाल तयार केला जातो. त्यामध्ये उत्तीर्णतेचे निकष व सवलतीचे गुण यांचा विचार करून कच्चा निकाल तयार होतो. हा निकाल मुख्याध्यापक तपासून अंतिम करतात. अंतिम निकाल तयार झाल्यानंतर वर्गशिक्षक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करतात हे सर्व कामकाज बिनचूक होण्यासाठी किमान १० ते १२ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे.

मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक भागांत एप्रिलच्या उत्तरार्धात उष्णतेची तीव्रता वाढते, पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये पॅट परीक्षा विलंबाने घेतल्यास वार्षिक परीक्षेलाही विलंब होऊ शकतो. या सर्व बाबींचा विचार करून पॅट परीक्षा २ ते १७ एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात याव्या. तसेच त्याबाबतचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाकडून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांकडे केली आहे.