पर्यावरण, इंधन बचतीचा ‘निळा’ सिग्नल!

नववीच्या विद्यार्थिनीचा पेटंटसाठी अर्ज

नववीच्या विद्यार्थिनीचा पेटंटसाठी अर्ज

शहरात कुठल्याही मार्गावरील प्रदूषणाचा विचार केला तर वाहतूक सिग्नलवर २३ पट प्रदूषण अधिक असते, हे जागतिक पातळीवरच मान्य झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन शेकडो लिटर इंधनही वाया जाते. मात्र सिग्नलवर सर्वानीच वाहन बंद केले तर पर्यावरण आणि इंधन बचत मोठय़ा प्रमाणात होऊ शकते, ही साधी संकल्पना नजरेपुढे ठेवून लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाबरोबरच ‘निळ्या’ रंगाच्या चौथ्या सिग्नलची संकल्पना नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मांडली आहे.

मुंबईत चौथ्या सिग्नलची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली तर भायखळा येथील जिजामाता जंक्शनवरील एका सिग्नलवर सकाळी व सायंकाळी प्रत्येकी तीन तासांच्या कालावधीत एकूण पावणेदोन तास वाहन बंद राहील आणि त्यामुळे १५६ लिटर इंधन वाचू शकते आणि ३७१ किलोग्रॅम घातक कार्बन डायऑक्साइड वायूचे विसर्जन रोखले जाऊ शकते, असा या विद्यार्थिनीचा दावा आहे. तिने सर्वेक्षणही केले आहे. नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल इंजिनीअरिंग अँड रिचर्स इन्स्टिटय़ूट म्हणजेच ‘निरी’चे संचालक डॉ. राकेश कुमार यांनीही या विद्यार्थिनीचे खास कौतुक केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘महाराष्ट्र क्लीन एअर मिशन २०२२’ या ताज हॉटेलमध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेत हा प्रकल्प घाटकोपरच्या पुणे विद्यार्थिगृहच्या विद्याभवन शाळेत शिकणाऱ्या ईशा खोत हिने मांडला. दिल्ली येथील विज्ञान स्पर्धेसाठी ईशाची निवड झाली होती. डॉ. भाभा केंद्राची शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या ईशाने यासाठी काही वेगळा प्रकल्प हवा, या दिशेने विचार सुरू केला. रस्त्यावर विशेषत: वाहतूक सिग्नलजवळ होणाऱ्या प्रदूषणाबाबत ती नेहमी चर्चा करायची. सिग्नलजवळ नक्कीच अधिक प्रदूषण होते, असे तिला वाटत होते. त्यासाठी मानसशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या शिवानी या बहिणीची तिने मदत घेतली. भायखळा येथे जाऊन त्यांनी  प्रदूषणाची मोजणी केली. अन्य ठिकाणच्या प्रदूषणाची मोजणी केली तेव्हा त्यात फरक आढळला. हे प्रदूषण रोखण्यासाठी सिग्नलवर वाहन बंद ठेवले तरी हे प्रदूषण कमी होऊ शकते, असे त्यांना वाटले. त्यातूनच चौथ्या रंगाच्या सिग्नलची निर्मिती झाली.

संकेतस्थळावरील घोळामुळे हा प्रकल्प पंतप्रधान प्रेरणा पुरस्कारासाठी पाठविता आला नाही. परंतु मुंबई पोलीस दलात सहायक आयुक्त असलेल्या दत्तात्रय खोत आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कार्यकारी अभियंता असलेल्या बिना खोत यांनी आपल्या मुलीची मेहनत वाया जाऊ दिली नाही. त्यांनी प्रदूषण मंडळाशी संपर्क साधून ही संकल्पना समजावून सांगितली. अखेर त्यांना राष्ट्रीय परिषदेत हा प्रकल्प सादर करण्याची संधी मिळाली. त्याचे कौतुकही झाले. आता पेटंट मंजूर व्हावे याची ते वाट पाहत आहेत. प्रदूषण मंडळाचे हवेतील प्रदूषण विभागाचे सहसंचालक विद्यानंद मोटघरे यांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले. या प्रकल्पाचे मूल्यांकन करून प्रायोगिक अंमलबजावणी करण्याबाबत पर्यावरण विभागाचे प्रदूषण मंडळाच्या सदस्य सचिवांना लेखी पत्र दिले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: School student application for patent

ताज्या बातम्या