मुंबई लोकलसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी विनंती पश्चिम आणि मध्य रेल्वेकडे केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार आहे. दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीसाठी शाळा उघडण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वेला यासंदर्भात एक पत्र लिहून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी विनंती केली होती. ही विनंती मान्य करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यासाठी ५० टक्के उपस्थितीचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेला पत्र लिहिण्यात आले होते. शिक्षकांसह शाळांमधील सर्व कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही माहिती दिली होती. अखेर आज ही मागणी मान्य करण्यात आली आहे. ११ नोव्हेंबरला पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला मध्य आणि पश्चिम रेल्वेने मंजुरी दिली आहे.

याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना, कोर्टात काम करणाऱ्या वकिलांना आणि कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासीच मुभा देण्यात आली. तसंच नवरात्रात सरसकट सर्व महिलांसाठीही लोकल प्रवास सुरु करण्यात आला. आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शाळा कशी गाठायची या विवंचनेत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.